ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - देशातील विद्यापीठांनी आता संशोधन व तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. विद्यापीठांनी अनुदानासाठी केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून राहू नये. त्यापेक्षा पेटंट, संशोधन यांच्या माध्यमातून पैसा मिळविण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपुरात आयोजित एका शिक्षक मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते. देशाची पुढील पिढी निर्माण करण्याची शिक्षकांवर जबाबदारी आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अधिकारांचे देखील संरक्षण झालेच पाहिजे. शिक्षणात राजकारण येता कामा नये. राजकारणविरहीत शिक्षणानेच दर्जा वाढू शकतो. राजकीय पक्ष व शिक्षक संघटना यांच्यात अंतर असलेच पाहिजे, असे प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केले.देशात १० लाख वैद्यकीय तज्ज्ञांची कमतरताआजच्या तारखेत देशात १० लाख वैद्यकीय तज्ज्ञांची कमतरता असल्याकडेही नितीन गडकरी यांनी लक्ष वेधले. ग्रामीण भागात डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र पैशांची कमतरता असल्यामुळे सरकार तेवढा खर्च करु शकत नाही. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे, असे गडकरी म्हणाले.
विद्यापीठांनी शासकीय अनुदानावर अवलंबून राहू नये- गडकरी
By admin | Published: January 29, 2017 8:44 PM