युद्धस्तरावर तयारी : आजपासून येणार इतर विद्यापीठांतील स्पर्धकनागपूर : २२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवात अव्वल स्थान पटकाविण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चमूने पूर्ण जोर लावला आहे. विविध विभाग व महाविद्यालयांतील ३८ विद्यार्थ्यांचा यात समावेश असून जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये नागपूरला यश मिळेल, असा विश्वास विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.निहाल शेख यांनी व्यक्त केला आहे.विद्यापीठाच्या चमूतील विद्यार्थ्यांची विविध पातळ्यांवर झालेल्या स्पर्धांमधून निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचा गेल्या काही दिवसांपासून कसून सराव सुरू आहे. लोककला आॅर्केस्ट्रा, शास्त्रीय गायन, चित्रकला, प्रश्नोत्तरे, एकांकिका, शास्त्रीय वादन, ताल वाद्य, कोलाज, पोस्टर मेकिंग, वादविवाद, नाटक, समूह गीत, कार्टुनिंग, वक्तृत्व, मिमिक्री, क्ले मॉडेलिंग, लोकनृत्य, स्पॉट फोटोग्राफी, पाश्चिमात्य गायन, रांगोळी इत्यादी स्पर्धांत हे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दरम्यान, ‘इंद्रधनुष्य’चे शुक्रवार २२ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. अर्थतज्ज्ञ व राष्ट्रीय योजना आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सकाळी ११ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहन खेडकर, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उमा वैद्य, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची उपस्थिती राहील. (प्रतिनिधी)
‘इंद्रधनुष्य’साठी विद्यापीठाच्या चमूचा जोर
By admin | Published: January 21, 2016 2:51 AM