लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्याची कोरोना स्थिती लक्षात घेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलाव्या, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले.
कोरोनामुळे राज्य शासनाने १५ मेपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. शिवाय केंद्र शासनानेदेखील अनेक महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सध्या बरेच विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे सर्व परीक्षा जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी अभाविपने केली. अनेक महाविद्यालयानी परीक्षा अर्ज महाविद्यालयात ऑफलाईन पद्धतीनेच भरणे अनिवार्य केले आहे. परंतु अनेक विद्यार्थी गावाला आहेत तर अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे ते महाविद्यालयात जाऊन अर्ज भरू शकत नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईनसोबत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ जुलैपर्यंत वाढवावी, अशी मागणीदेखील अभाविपने केली आहे.
प्रवेश शुल्कासाठी जबरदस्ती नको
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून परीक्षा व इतर विषयांसाठी हेल्पलाईन नंबर देण्यात यावा. तसेच महाविद्यालयाने प्रवेश शुल्कासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित ठेवू नये. शुल्कासाठी जबरदस्ती करणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.