लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातून मोठी आस घेऊन शिक्षणासाठी शहरात आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे. शहरातील महाविद्यालय असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शहरापासून दूर अंतरावरील वसतिगृहात स्थानांतरित केल्याने त्यांना अनेक गैरसोर्इंचा सामना करावा लागत आहे. पायपीट करून बसस्टॅँडवर पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नाही. शिक्षणाचा अक्षरश: खेळखंडोबा होत असल्याची कैफियत विद्यार्थ्यांनी मांडली.सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांची महाविद्यालये ही शहराच्या भागात आहेत. त्यामुळे शहरातच वसतिगृहाची व्यवस्था झाल्यास त्यांना सोयीचे होते. हे विद्यार्थी स्वत:च्या सायकलनेही कॉलेजमध्ये पोहचू शकतात. मात्र यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना यावर्षी शहराबाहेरील वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली. अशाच वर्धा रोडवरील रुई पांजरी ग्रामपंचायतमध्ये असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. हे वसतिगृह शहरापासून २२ किलोमीटर दूर अंतरावर आहे. आधी हे वसतिगृह मेन रोडवर असल्याचे सांगत वेळेवर बस मिळत असल्याचे सांगण्यात आले. मात्र मुख्य रस्त्यापासून दूर जंगलात असलेल्या गावामध्ये हे वसतिगृह आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी बरेच दूर पायी चालावे लागते. त्यानंतरही वेळेवर त्यांना बस मिळत नाही. बहुतेक विद्यार्थी धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, डॉ. आंबेडकर कॉलेज, के.डी.के. कॉलेज आदी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील बहुतेकांचे कॉलेज हे सकाळी ७ वाजतापासून सुरू होतात. मात्र रिठीवरून पहिली बसच ७.३० वाजता सुटते. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहचेपर्यंत ९.३० वाजतात व तोपर्यंत अनेक वर्ग संपलेले असतात.कॉलेज ११.३० वाजता सुटल्यानंतर मुलांना ४ वाजताच्या बसची वाट पहावी लागते. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेवर नाश्ता मिळत नाही व हे विद्यार्थी महाविद्यालयाची वेळ पाळण्यासाठी नाश्ता सोडून उपाशीच निघतात. त्यामुळे त्यांना दिवसभर उपाशी राहावे लागते. वर्धा रोडवर असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहाची सुविधा होते, मात्र शहरातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक त्रास आणि शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना शहरातीलच वसतिगृहात स्थानांतरित करण्यात यावे आणि शक्य असेल तर महाविद्यालयाच्या वेळेनुसार बसची सुविधा करून देण्यात यावी, या मागणीचे निवेदन झरीच्या वसतिगृहात राहणाऱ्या ७० च्यावर विद्यार्थ्यांनी विभागाकडे केली आहे.
म्हणून केले विद्यार्थ्यांना स्थानांतरितयाबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दीक्षाभूमीजवळील संत चोखामेळा वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येणार असल्याने या विद्यार्थ्यांना झरी पांजरीच्या वसतिगृहात स्थानांतरित केल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे चोखामेळाचे दोन वसतिगृह आहेत. त्यापैकी जुन्या म्हणजे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना स्थानिक वसतिगृहात जागा देण्यात आली व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आले. झरी पांजरीचे वसतिगृह जंगलात आहे. येथे वैद्यकीय सुविधा नाहीत व विद्यार्थ्यांना जंगली श्वापदांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरातील मानेवाडा किंवा मनीषनगरच्या वसतिगृहात व्यवस्था करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.