आशीष दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी मिळाल्यामुळे अनेक पालक चिंतेत असून, प्रवेशासाठी महाविद्यालयांत चकरा मारत आहेत. अनेक महाविद्यालयांत जागा रिक्त आहेत. मात्र स्थितीचा फायदा घेत प्रवेशासाठी ‘डोनेशन’ची मागणी करण्यात येत आहे. व्यवस्थापन कोट्याच्या नावाखाली हा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक महाविद्यालये अनुदानित आहेत.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, नामवंत महाविद्यालयांकडून ‘डोनेशन’ मागण्यात येत आहे. अभियांत्रिकीच्या एका एका जागेसाठी ४ ते ५ लाख रुपये, बीफार्मसाठी ३ ते ४ लाख रुपयांची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क वेगळ्याने भरण्यास सांगितले जात आहे. बीएस्सी, बीकॉममध्ये प्रवेशासाठीदेखील ‘डोनेशन’ची मागणी करण्यात येत आहे. ग्रामीण क्षेत्रांत बीएस्सीमध्ये (कॉम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, आयटी, मायक्रोबायोलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ३० ते ५० हजार तर शहरी भागात ५० ते ७५ हजार रुपयांची ‘डोनेशन’ मागण्यात येत आहे. बीकॉममध्ये इंग्रजी अभ्यासक्रमाला सर्वाधिक मागणी आहे. या अभ्यासक्रमाच्या अनुदानित जागेवर प्रवेशासाठी अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत ‘डोनेशन’ मागण्यात येत आहे. ‘डोनेशन’ न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी गुणांचे कारण देऊन विना अनुदानित अभ्यासक्रमातील ‘बीसीसीए’मध्ये प्रवेश घेण्यास सांगितले जात आहे. ‘बीकॉम’ अनुदानित अभ्यासक्रमाचे शुल्क ५०० ते १५०० रुपये आहे, तर ‘बीसीसीए’चे शुल्क १५ हजार ते ३५ हजार आहे.अनेक महाविद्यालयांत जागा रिक्त राहण्याचा धोका आहे. मात्र विद्यार्थ्यांना वास्तव सांगण्याचे टाळण्यात येत आहे.
विद्यापीठाचे मौनमहाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात विद्यापीठाने मौन धारण केले आहे. विद्यापीठाने केवळ प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले. कुठल्याही महाविद्यालयाने ‘डोनेशन’ घेऊ नये, असा इशारा देण्यात आलेला नाही. महाविद्यालयात कशाप्रकारे प्रवेश होत आहेत, यावर विद्यापीठाकडून कुठल्याही प्रकारे लक्ष देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.