लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याबाबत मंगळवारी व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. श्रीचक्रधरस्वामी यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेल्या या अध्यासनात सुरुवातीला एकही अभ्यासक्रम राहणार नाही. अशास्थितीत विद्यार्थी व नवीन पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचतील तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठात महानुभाव साहित्याचे वाचन, संशोधन व्हावे, वेगवेगळ्या दिशांनी या साहित्यांचा अभ्यास व्हावा, यादृष्टीने महानुभाव पंथाचे जनक श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावे अध्यासन सुरू करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. २०१६ साली मुख्यमंत्र्यांनीदेखील नागपूर विद्यापीठात हे अध्यासन सुरू करण्यात येईल व त्याला आर्थिक पाठबळही दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी दोन कोटी रुपयांची विशेष तरतूददेखील करण्यात आली.नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळ, विद्यापरिषदेने अध्यासन स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यासंदर्भात विद्यापीठाची मान्यता घेण्यासाठी मंगळवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला व त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. अध्यासनाला मंजुरी मिळाली असली तरी येथे कुठलाही अभ्यासक्रम चालविण्यात येणार नाही. येथे केवळ संशोधनासाठी संदर्भ ग्रंथ व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले. सोबतच सरकारकडून निधी आल्यानंतर वर्षभराने अध्यासनाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असेदेखील त्यांनी सांगितले. जर अध्यासनात एकही अभ्यासक्रम राहणार नसेल तर विद्यार्थी श्रीचक्रधरस्वामी अध्यासनाकडे वळतीलच का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठ; चक्रधरस्वामी अध्यासनात कुठलाही अभ्यासक्रम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:41 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या या अध्यासनात सुरुवातीला एकही अभ्यासक्रम राहणार नाही. अशास्थितीत विद्यार्थी व नवीन पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचतील तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचणार विचार?