लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत कोरोनाच्या प्रकोपामुळे अनेकांचे जीव गेले व याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनादेखील बसला. पुढील धोका लक्षात घेऊन विद्यापीठाने तातडीने ऑक्सिजन प्लान्ट उभारावा. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांत विद्यापीठातील चार ते पाच कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शिवाय अनेक जण बाधितदेखील झाले होते. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसोबतच त्यांचे कुटुंबीय, विद्यार्थी यांच्यासमवेत समाजासाठीदेखील विद्यापीठाने पावले उचलायला हवी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात यावा. तसेच विद्यापीठांतर्गत असलेले विद्यार्थ्यांचे वसतिगृह सद्य:स्थितीत रिकामे आहे. त्यामुळे तेथे वैद्यकीय सेवा प्रदान करणाऱ्या संस्थानांशी करार करून कोविड संदर्भातील प्रथमोपचार सेवा सुरू करावी. याचा लाभ विद्यार्थ्यांना, विद्यापीठ शिक्षक/ शिक्षकेतर यांच्या कुटुंबीयांना व समाजातील इतर घटकांनासुद्धा सहज घेता येईल, अशी मागणीदेखील करण्यात आली.
मृत्यू झालेल्यांच्या निकटवर्तीयांना नोकरी द्या
विद्यापीठातील ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या पाल्यांना किंवा निकटवर्तीयांना तातडीने विद्यापीठाने आस्थापनेत सामावून घ्यावे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांपर्यंतचा वैद्यकीय अग्रीम निधी मंजूर करावा. तसेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ यांच्याप्रमाणे नागपूर विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विमा कवच पुरविण्यात यावे, अशी मागणीदेखील कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली.