लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या आंदोलनामुळे गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संपूर्ण काम ठप्प झाले होते. संघटनांनी सायंकाळी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठ आता नवीन वेळापत्रक तयार करणार की आणखी काही भूमिका घेणार, याकडे हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणेच नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनीदेखील सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी, या मागणीसाठी २४ सप्टेंबरपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले. सरकारशी वाटाघाटी न झाल्यामुळे १ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.गुरुवारी नागपूर विद्यापीठाच्या महाराजबागजवळील कार्यालयात कर्मचारी व अधिकारी एकत्रित आले. दिवसभर कुठल्याही पद्धतीचे काम झाले नाही. केवळ संवैधानिक पदांवरील अधिकारीच कार्यालयात होते. बाकी सर्व कर्मचारी व अधिकारी आंदोलनस्थळी होते. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेण्यात आली. मात्र सायंकाळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने १७ ऑक्टोबरपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे पत्र जारी केले. त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संयुक्त कृती समितीनेदेखील आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यासंदर्भात कुलगुरूंना पत्र लिहून कळविण्यात आले.परीक्षा विभागासमोरील डोकेदुखी कायमआता अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा कधी घ्याव्या यासंदर्भात अंतिम निर्णय होणे बाकी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाला नवीन वेळापत्रक तयार करावे लागेल. शिवाय जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यांनी १९ ऑक्टोबरपासून परत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अशा स्थितीत विद्यापीठासमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. यापुढील रूपरेषा लवकरच निश्चित करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित, आता परीक्षा कधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 9:38 PM