योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत कधीही ‘नॅक’चा चमू विद्यापीठाला भेट देऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व लक्ष ‘नॅक’वर केंद्रित झाले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने रंगीत तालमीवर भर दिला असून त्यासाठी गठित पाहणी समितीत विविध विद्यापीठांतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला होता. ‘नॅक’प्रमाणेच या समितीकडून विभागांची पाहणी झाली असून, विभागप्रमुखांना विविध बाबींबाबत सखोल विचारणादेखील झाली.
नागपूर विद्यापीठाला डिसेंबर २०१९ पर्यंत 'नॅक'चा 'अ श्रेणी' दर्जा मिळाला होता. त्यापूर्वी नव्या मूल्यांकनासाठी 'नॅक'ला प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते. प्रशासकीय हलगर्जीपणामुळे डिसेंबर २०१९ पर्यंत अहवाल तयार झाला नव्हता. त्यातच वर्षाअखेरीस ‘नॅक’ने नवीन निकष जारी केले. अनेक मुद्द्यांचे ‘ऑनलाइन’ पुरावे जोडणे आवश्यक झाले. त्यामुळे अहवाल जवळपास तयार झाला असतानादेखील तो विद्यापीठाला पाठविता आला नाही. त्यानंतर नव्याने अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मध्यंतरीच्या कालावधीत डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ संपला व डॉ. सुभाष चौधरी कुलगुरूपदी आले. यात अहवालाचे काम मागे पडले. अखेर मागील वर्षअखेरीस ‘नॅक’ला स्वयंअध्ययन अहवाल (एसएसआर) पाठविण्यात आला आहे.
‘नॅक’ला विद्यापीठाने सप्टेंंबरमधील तारखा पाठविल्या आहेत. अद्याप ‘नॅक’ तिकडून अधिकृत तारखा आल्या नसल्या तरी सप्टेंबर महिन्यातच चमू येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे. परंपरेला बाजूला सारत तज्ज्ञांचा समावेश असलेली पाहणी समिती गठित करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील एका संशोधन संस्थेच्या सदस्यांचादेखील यात समावेश होता. या समितीच्या सदस्यांनी प्रत्येक विभागाची पाहणी केली व तेथील एकूण प्रगती तसेच कार्य जाणून घेतले. काही विभागांत विभागप्रमुखांना सादरीकरण देखील करायला लावले व बऱ्याच मुद्द्यांवर अडचणीत आणणारे प्रश्नदेखील उपस्थित केले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रत्यक्ष भेटीवर ३० टक्के गुण अवलंबून
मागील पाच वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर स्वयंअध्ययन अहवाल तयार करण्यात आला आहे. शैक्षणिक मापदंड, संशोधन, प्रशासन, विद्यार्थ्यांचा सहभाग इत्यादी मुद्द्यांवर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.'नॅक'च्या चमूकडून होणाऱ्या प्रत्यक्ष पाहणीला ३० टक्के महत्त्व देण्यात आले आहे. उर्वरित गुणांसाठी पिअर चमूची भेट महत्त्वाची ठरणार असून, ती विद्यापीठाची खरी परीक्षा असेल.