योगेश पांडे ल्ल नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज गतीमान करण्याचा संकल्प कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनाय काणे यांनी केला आहे. मात्र विद्यापीठाचे कामकाज वर्षभरात किती गतीमान झाले, हा संशोधनाचा विषय होईल ! मात्र विद्यापीठाकडून पदव्यांच्या सुरक्षेबाबत किती हलगर्जीपणा करण्यात येतो याचा प्रत्यक्ष अनुभव ‘लोकमत’ प्रतिनिधीने ‘आॅन द स्पॉट’ घेतला. छापील पदव्यांना पुढील प्रक्रियेसाठी दुचाकीवर अगदी पायाच्या शेजारी ठेवून नेण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. पावसाळी वातावरण असतानादेखील या पदव्यांची या पद्धतीनेच ने-आण होत होती. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकाराची विद्यापीठातील अधिकाऱ्यांना माहितीदेखील नाही.नागपूर विद्यापीठाच्या पदवी छापण्याचा कंत्राट एका खाजगी कंपनीला देण्यात आला आहे. या पदवी छापून ‘बॉक्स’मध्ये परीक्षा भवनात आणण्यात येतात व तेथून त्यांची तपासणी झाल्यानंतर या पदवी ‘लॅमिनेशन’साठी नेण्यात येतात. एरवी या पदवी परीक्षा भवनात सुरक्षितपणे ठेवण्यात येतात. परंतु ‘लॅमिनेशन’साठी बाहेर नेत असताना पदवींचा गठ्ठा दुचाकीवर पायाखाली ठेवून नेण्यात येत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. या पदवीच्या गठ्ठ्यांवर कुठलेही आवरणदेखील नव्हते अन् सर्वात खालच्या पदवीला तर धूळ लागलेली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे पदवींची ने-आण करीत असताना त्या सहजपणे खराब होणे किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे. या बाबीची माहिती असूनदेखील याची अशीच वाहतूक सुरू होती. विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये पदवीचे फार मोठे महत्त्व असते व या पदवीसाठी ते दिवसरात्र मेहनत करतात. परंतु विद्यापीठाचे प्रशासन मात्र पदवीच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे हा एक मोठा प्रश्नच आहे. .असा प्रकार अयोग्यच : प्र-कुलगुरूयासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले. विद्यापीठाच्या पदवींची सुरक्षा आवश्यकच आहे. परंतु जर त्याबाबतीत हलगर्जीपणा होत असेल तर ही अयोग्य बाब आहे. विद्यापीठाचे नवे परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित कंपनीला फटकारले असून आता सर्व पदवींची ने-आण ही सुरक्षित पद्धतीनेच होईल याची काळजी घेण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती डॉ.येवले यांनी दिली.
विद्यापीठाच्या पदव्या असुरक्षित
By admin | Published: September 30, 2015 6:46 AM