लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनोळखी व्यक्तीला फोनवरून आपली माहिती देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. पाच लाखांचे क्रेडिट कार्ड देण्याची बतावणी करून राजेंद्र गोपाळराव येवले (वय ४७) यांच्याकडून आधारकार्डसह महत्त्वाची माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्या आरोपीने येवले यांना १ लाख २० हजारांचा चुना लावला.२२ एप्रिलला झालेल्या या बनवाबनवीप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. राजेंद्र येवले यांनी एप्रिल २०१८ पूर्वी बजाज फायनान्समधून कर्ज घेऊन फ्लिपकार्डमधून मोबाईल विकत घेतला होता. त्यामुळे त्यांनी आपला मोबाईल नंबर त्यावेळी काही जणांना सांगितला होता. या पार्श्वभूमीवर, २२ एप्रिलला सकाळी ९.४४ वाजता त्यांना ८२९२५८५३१८ क्रमांकाच्या मोबाईल नंबरवरून येवलेंना फोन आला. आरोपीने येवले यांच्याशी बोलताना आपला परिचय बजाज फायनान्स कंपनीतील अधिकारी म्हणून दिला. तुम्हाला पाच लाखांपर्यंतच्या मर्यादेचे क्रेडिट कार्ड द्यायचे आहे, असे सांगून आरोपीने त्यांची संपूर्ण माहिती विचारून घेतली. पत्नीचाही आधार कार्ड नंबर घेतला. त्यानंतर त्याचा गैरवापर करून फ्लिपकार्डच्या माध्यमातून १ लाख १९ हजार ८९९ रुपयांच्या अॅपलचे दोन मोबाईल विकत घेतले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर येवले यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.---
अनोळखी व्यक्तीला फोनवरून माहिती देणे नडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 7:37 PM
अनोळखी व्यक्तीला फोनवरून आपली माहिती देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. पाच लाखांचे क्रेडिट कार्ड देण्याची बतावणी करून राजेंद्र गोपाळराव येवले (वय ४७) यांच्याकडून आधारकार्डसह महत्त्वाची माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्या आरोपीने येवले यांना १ लाख २० हजारांचा चुना लावला.
ठळक मुद्देक्रेडिट कार्ड देण्याची बतावणी : सव्वालाखाचा चुना लावला