हायकोर्ट : सोमवारी हजर होण्याचे आदेश नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फौजदारी अवमानना प्रकरणात अॅड. सतीश उके यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्यांना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. ते न्यायालयात उपस्थित न राहिल्यास प्रबंधक कार्यालयात जमा असलेली त्यांची सुरक्षा रक्कम जप्त करण्याचे निर्देश देण्यात येईल व प्रकरणावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी आदेशात देण्यात आली आहे. प्रकरणावर २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होती. त्यावेळी उके यांना न्यायालयात उपस्थित राहायचे होते. परंतु, त्यांनी व्यक्तीश: उपस्थित न राहता अॅड. सी. जे. जोवेसन यांना न्यायालयात हजर केले. तसेच, प्रकरणावरील सुनावणी तहकूब करण्यासाठी जोवेसन यांच्या मार्फत अर्ज सादर केला. त्यावरून न्यायालयाने संतप्त होऊन उके यांना फटकारले. १ फेब्रुवारीच्या सुनावणीत उके यांना त्यांची इच्छा असल्यास ८ फेब्रुवारीपर्यंत अन्य वकीलाला नियुक्त करण्यास सांगण्यात आले होते. वकील आत्ताच नियुक्त केल्याच्या कारणावरून सुनावणी तहकूब केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर उके यांनी अन्य वकील नियुक्त न करता ८ व २२ फेब्रुवारी रोजी स्वत:च युक्तिवाद केला. असे असताना सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली जात असल्याचे न्यायालयाने संतप्तपणे सांगून उके यांना २७ फेब्रुवारीपर्यंत वेळ मंजूर केला. उके यांनी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहण्यापासून सूट मिळण्यासाठीही अर्ज सादर केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून उके यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला.(प्रतिनिधी)
सतीश उके यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट
By admin | Published: February 25, 2017 2:04 AM