नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या विविध समितींचे सभापती व उपसभापती पदासाठी शुक्रवारी उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्रत्येक समितीमध्ये दोन पदांसाठी एक एकच नामांकन झाले. त्यामुळे निवडणुका अविरोध होतील, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत १ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.
दहा समित्यांसाठी नामांकन झाले. स्थापत्य व प्रकल्प समितीच्या सभापती पदावर राजेंद्र सोनकुसरे, उपसभापती पदासाठी निशांत गांधी, आरोग्य समितीच्या सभापतीसाठी महेश महाजन, उपसभापती म्हणून विक्रम ग्वालबंशी, विधी व सामान्य प्रशासन समितीच्या सभापतीसाठी अॅड. मीनाक्षी तेलगोटे, उपसभापतीसाठी वनिता दांडेकर यांनी नामांकन दाखल केले. शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी दिलीप दिवे, उपसभापती पदासाठी सुमेधा देशपांडे आणि कर संकलन समितीच्या सभापती पदासाठी महेंद्र धनविजय, उपसभापती पदासाठी सुनील अग्रवाल यांनी नामांकन दाखल केले.
स्लम वस्ती निर्मूलन समितीच्या सभापती पदावर हरीश दिकोंडवार तर उपसभापती पदासाठी रुतिका मसराम, क्रीडा सभापती पदासाठी प्रमोद तभाने, उपसभापती पदासाठी लखन येरावार यांनी अर्ज भरला. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी दिव्या धुरडे, उपसभापती पदासाठी अर्चना पाठक, जलप्रदाय समिती सभापतीपदासाठी संदीप गवई व उपसभापती पदासाठी सरला नायक, अग्निशमन व विद्युत समितीच्या सभापतीपदासाठी दीपक चौधरी व उपसभापती पदासाठी किशोर वानखेडे यांनी नामांकन भरले. डॉ.रंजना लाडे यांनी अर्ज स्वीकारले. यादरम्यान दत्तात्रय डहाके, सुरेश शिवणकर, विलास धुर्वे उपस्थित होते.