नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या संबंधाने सटोडे, पंटर, हजारो कोटींची लगवाडी करण्यास तयार आहेत. मात्र, 'चोरभावाने' बिचकलेल्या बड्या बुकींनी प्रथमच थंड भूमीका स्विकारत खयवाडीला नकार दिला आहे. त्यामुळे मध्य भारतातील सट्टा बाजारात सध्या अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे.
क्रिकेटचे सामने असू देत की देश-विदेशातील निवडणूका, प्रत्येक घडामोडीवर मध्य भारतातून अर्थात नागपुरातून हजारो कोटींच्या सट्ट्याची लगवाडी-खयवाडी होते. एकवेळेचा उमेदवार, त्याचे समर्थक यांचे अंदाज चुकतील मात्र बुकींचा अंदाज चुकत नाही, असे आता-आतापर्यंत मानले जायचे. मात्र, गेल्या लोकसभा निवडणूकीत एक्झिट पोल फसले अन् बुकी बाजाराचेही अनेक जागेवरचे अंदाज चुकले. त्यामुळे ठिकठिकाणच्या बुकींना मोठा फटका बसला. अनेक बुकींचे तर कंबरडेच मोडले. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीचा धुरळा उडाला. महायुती आणि महाआघाडी दोन्हीकडून सारखा दम लावण्यात आल्याने २८८ पैकी बहुतांश मतदार संघात 'कांटे का मुकाबला' असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मध्य भारताचा सट्टा बाजार प्रथमच गोंधळला आहे. देशातील सर्वात मोठा आणि अचूक अंदाज वर्तविणाऱ्या 'फलाैदी'चा अंदाज आणि एक्झिट पोलचा अंदाजही महायु्तीच्या बाजूने आहे. मात्र, प्रत्यक्ष ठिकठिकाणांहून रोज वेगवेगळे भाव येत आहे. त्यामुळे धोका पत्करण्याचे बुकींनी टाळले आहे. या पार्श्वभूमीवर, पंटरकडून लगवाडी-खयवाडीसाठी सारखी विचारणा होत असल्याने बड्या बुकींनी नकार देण्यासाठी नवीन युक्ती शोधली आहे. 'ईलेक्शन... ईलेक्शन ... भाव बंद, भाव बंद' अब कोई न पुछे.... २३ को सब मिलेंगे, तब अपने अपने बूक मिलायेंगे' असा अफलातून मेसेज तयार केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा मेसेज 'सट्टा बाजारात' चांगलाच व्हायरल होत आहे.
हॉट सीटवर वेगवेगळे भाव
हॉट सीट समजल्या जाणाऱ्या काही मतदार संघावर कुणी भाव देण्यास तर कुणी उतारी करण्यास तयार नाही. बहुचर्चित उमेदवारावर कुणी ६५-८० कुणी ८०-१ तर कुणी ९०-९० चा रेट देत आहे. अर्थात दिल्या जाणाऱ्या रेटवर एकवाक्यता नाही. (याला बुकीबाजारात चोर-भाव' म्हणतात.) या चोरभावाने बुकी बिचकले आहेत. त्याचमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या संबंधाने सटोडे, पंटर, हजारो कोटींची लगवाडी करण्यास तयार आहे. मात्र, बड्या बुकींनी खयवाडीला नकार दिला आहे. चिल्लर आणि नवखे बुकी मात्र अस्थिर दराच्या आधारे खयवाडी करून घेत आहेत.