सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व विदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरसह भंडारा, वर्धा, चंद्रपूर, व गोंदिया जिल्ह्यात एप्रिल ते जुलै २०१८ या दरम्यान ४ लाख लोकांची तपासणी करण्यात आली. यात १० हजार रुग्णांना मधुमेह, २१ हजार रुग्णांना रक्तदाब, ८८३ रुग्णांना हृदयरोग, ७१० रुग्णांना पक्षाघात तर १५८ रुग्णांना विविध प्रकाराचा कर्करोग आढळून आला. संसर्गजन्य आजारांपेक्षा असंसर्गजन्य आजाराचा धोका वाढत असल्याचे हे चित्र असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.पूर्वी संसर्गजन्य आजारांमुळे मृत्यूची टक्केवारी मोठी होती. अलीकडे नवनवे संसर्गजन्य आजार डोके वर काढत असले तरी लसीकरण व जनजागृतीमुळे हे आजार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आले आहे. परंतु त्या तुलनेत असंसर्गजन्य असलेले आजार विशेषत: मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, पक्षाघात व कर्करोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. कामाचा ताण, प्रदूषण, वाढलेली आयुमर्यादा व बदललेली जीवनशैली यामुळे हे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. याला घेऊनच राज्यात आॅगस्ट २०११ पासून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ३० वर्षांवरील लोकांवर कर्करोग, हृदयरोग, मधुमेह व पक्षाघाताची तपासणी करणे, तशी नोंद घेणे, या रुग्णांवर मोफत तपासणी व उपचार करणे सुरू झाले. एप्रिल २०१८ पासून नागपूर व गोंदिया जिल्ह्यातही या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत असंसर्गजन्य आजार वाढल्याचे वास्तव समोर आले आहे.
रक्तदाब व मधुमेहाचे वाढते रुग्णया कार्यक्रमांतर्गंत एप्रिल ते जुलै २०१८ या कालावधीत भंडारा जिल्ह्यात १३८२०९ लोकांची तपासणी करण्यात आली. यात मधुमेहाचे ९०४, रक्तदाबाचे ५४५९ दिसून आले.वर्धा जिल्ह्यात ४९५२१ लोकांची तपासणी करण्यात आली. मधुमेहाचे ५९९, रक्तदाबाचे ७५९ रुग्ण आढळले. ४गडचिरोली जिल्ह्यात ५४२४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मधुमेहाचे ४३१, रक्तदाबाचे १३६२ रुग्णांची नोंद झाली.चंद्रपूर जिल्ह्यात १०४८६९ रुग्णांची तपासणी केली असता मधुमेहाचे २५७०, रक्तदाबाचे ५९०३ रुग्ण आढळून आले.नागपूर जिल्ह्यात ५०९६० रुग्णांची तपासणी केली असता मधुमेहाचे ६१८, रक्तदाबाचे १३३९, हृदयविकाराचे तरगोंदिया जिल्ह्यातील ३०४४४ रुग्णांची तपासणी केल्यावर मधुमेहाचे ५२१० आणि रक्तदाबाचे ६८३० रुग्ण आढळून आले.
संसर्गजन्य आजारापेक्षा असंसर्गजन्य आजार म्हणजे, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आदी वाढण्याचे अनेक कारण आहेत. यातील म्हत्त्वाचे म्हणजे बदललेली जीवनशैली, ताण, प्रदूषण, वाढलेली आयुर्मर्यादा हे आहेत. या सोबतच तंबाखू, धूम्रपान व दारूचे सेवनही याला कारणीभूत ठरत आहे.-डॉ. जय देशमुख