नागपूर : यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वनदेवी चौकाजवळ दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. एकतर्फी प्रेमातूनच संबंधित तरुणावर हल्ला करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास डेकोरेशनचे काम करणारा मोहम्मद साहील ऊर्फ अफजल (२४, वनदेवीनगर) याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर यामागे प्रेमाचा अँगल असल्याची बाब समोर आली. मो. साहिलला उत्तर प्रदेशमधील आझमगड येथे राहणाऱ्या त्याच्या नातेवाइकाच्या मुलीशी लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने तिला नागपूरला आणले होते. मो. साहिल व त्याचा भाऊ हेदेखील मूळचे उत्तर प्रदेशमधील गाजीपूर येथील आहेत.
साहिलला गुरुवारी दुपारी शोएब अन्सारी ऊर्फ सफर अन्सारी (२३, वनदेवीनगर झोपडपट्टी) व सय्यद इर्शाद ऊर्फ गुड्डू इजाज (२३, वनदेवीनगर, झोपडपट्टी) या दोघांचा फोन आला होता. त्यांनी साहिलला फोन करून संतोषनगर चौकाजवळ बोलविले होते. आझमगड येथून आणलेल्या मुलीवर माझे प्रेम असून आमच्या दोघात तू येऊ नको, अशी धमकी शोएबने दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी साहिलच्या पोटावर, हातावर व पायावर चाकूने वार केले. वार इतके जोरात होते की, साहिलच्या पोटातील आतडे बाहेर आले. त्याला लोकांनी मेयो इस्पितळात दाखल केले. सुरुवातीला त्याने आरोपी कोण आहेत, हे माहीत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला असता संशयावरून शोएब व सय्यदला ताब्यात घेतले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. साहिलचा भाऊ मो. अफसर ऊर्फ मो. शकील याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एकाच दिवसात प्रेम कसे ?
संबंधित मुलगी ८ मार्च रोजी आझमगडहून नागपुरात आली. २४ तासांच्या आतच साहिलवर हल्ला झाला. एका दिवसात शोएबला मुलीवर प्रेम कसे काय झाले की अगोदरपासूनच तो मुलीला ओळखत होता, हा प्रश्न उपस्थित होत असून पोलिस त्या दिशेनेदेखील चौकशी करत आहेत.