नागपूर : विद्यार्थ्यांना घेऊन नागपूर शहराच्या दिशेने निघालेली स्कूल बस अनियंत्रित झाल्याने राेडलगत वाहनाची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घाेळक्यात शिरली. त्यामुळे एका विद्यार्थी बसला अडकला व काही दूर घासत गेला. दाेघे बसच्या खाली येत दाेन्ही चाकांच्यामधून बाहेर आल्याने थाेडक्यात बचावले. घासत गेलेल्या विद्यार्थ्याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना काेराडी (ता. कामठी) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हसाळा येथे मंगळवारी (दि. २२) दुपारी २.५१ वाजताच्या सुमारास घडली.
सम्यक दिनेश कळंबे (१४, रा. बाराखोली, इंदाेरा, नागपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सम्यक म्हसाळा (ता. कामठी) येथील मेरी पाॅस्टपीन स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकायचा. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ताे त्याच्या मित्रांसाेबत राेडलगत ऑटाेची प्रतीक्षा करीत उभा हाेता. काही वेळाने त्याच्या शाळेची एमएच-४०/एटी-०४८७ क्रमांकाची स्कूलबस विद्यार्थ्यांना घेऊन आली. काही कळण्याच्या आत ती बस अनियंत्रित झाली आणि समाेर असलेल्या कारला धडक देत राेडलगत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घाेळक्यात शिरली.
यात सम्यक बसला अडकला तर दाेने विद्यार्थी बसच्या खाली आले. मात्र, ते दाेन्ही चाकांच्या मध्ये आल्याने त्यांना दुखापत झाली नाही. सम्यक बससाेबत काही दूर घासत गेल्याने गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला बसच्या चाकापासून काढले आणि लगेच नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. अंबादास रामटेक, रा. शांतीनगर, नागपूर असे स्कूलबसचालकाचे नाव आहे. वृत्त लिहिस्ताे गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
विजेच्या खांबाला धडक
सम्यक बसला अडकताच नागरिक चालकाच्या दिशेने धावत त्याला बस थांबविण्याची सूचना करीत हाेते. त्या बसने समाेर असलेल्या दाेन कारला धडक देत राेडलगत असलेल्या विजेच्या खांबाला धडक दिली. त्या खांबाजवळ काही स्कूल व्हॅन आणि विद्यार्थिनी उभ्या हाेत्या. बस आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पळ काढला. त्यातच ती बस खांबावर आदळली. खांब वाकल्याने विजेच्या ताराही तुटल्या हाेत्या. अपघात हाेताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी केली हाेती.