नागपूर : सध्या कडक उन्हामुळे हाेरपळणाऱ्या नागपूरसह विदर्भातील नागरिकांना दाेन दिवसात गारव्याचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दाेन दिवसानंतर शनिवार ६ एप्रिलपासून ते गुढीपाडव्यापर्यंत चार दिवस विदर्भासह संपर्ण महाराष्ट्रात अवकाळीचे ढगाळ वातावरण राहिल व तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
विदर्भात चार दिवसापासून उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले आहेत. बुलढाणा वगळता सर्व १० जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंशाच्यावर पाेहचले आहे. नागपुरात सरासरीच्या १.८ अंशांनी वर ४१.२ अंश तापमानाची नाेंद झाली. विदर्भात वर्धा, ब्रह्मपुरी, अकाेला व यवतमाळचे कमाल तापमान ४२ अंशांच्या वर पाेहोचले आहे. चंद्रपूर, अमरावती ४१ अंशांवर आहे. दिवसा उन्हाच्या झळा व रात्री उकाड्याचा त्रास सहन करावा लागताे आहे. हवामान विभागाने पुढचे दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा दिला आहे. शुक्रवार व शनिवारी ही तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान ६ एप्रिलपासून आकाशात ढगांची गर्दी हाेण्याचा अंदाज आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ८ एप्रिल राेजी नागपूरसह गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता अधिक जाणवते. मुंबई, काेकण वगळता महाराष्ट्रातील बहुतेक भागात ही स्थिती राहणार आहे.