निशांत वानखेडे, नागपूर : अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तीन चार दिवस उन्हापासून दिलासा दिल्यानंतर उन्हाची काहुली पुन्हा वाढली आहे. आकाशातून ढगांची गर्दी हटताच उन्हाळ्याच्या झळा झाेंबायला लागल्या आहेत. पाऱ्याने पुन्हा उसळी घेतली आहे. ढगाळ वातावरणात ३० अंशाच्या खाली घसरलेला विदर्भातील पारा दाेन दिवसात पुन्हा १० ते १४ अंशाने उसळी घेत ४० अंशाच्या वर पाेहचला आहे.
रविवारी नागपूरचे तापमान २ अंशाने वाढत ४२.२ अंशाची नाेंद झाली, जे सरासरीपेक्षा २.६ अंशाने अधिक आहे. गुरुवारी हाच पारा २६ अंशापर्यंत खाली घसरला हाेता, हे विशेष. विदर्भात अकाेला येथे सर्वाधिक ४३.२ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली. याशिवाय चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातही तापमान ४२ अंशाच्या वर नाेंदविण्यात आले. वर्धा ४१.१ अंश, गडचिराेली ४०.६ अंश, गाेंदिया ४०.४, तर भंडारा ४०.२ अंशावर वधारले आहे. सर्वत्र रात्रीचे किमान तापमान २१ ते २३ अंशाच्या सरासरीत आहे. काेरड्या वातावरणाने सकाळी ३४ टक्क्यावर असलेली आर्द्रता सायंकाळी १८ टक्क्यापर्यंत खाली आली आहे.
सध्या पश्चिम बिहार ते पश्चिम विदर्भापर्यंत सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भात काहीसे ढगाळ वातावरण व वाशिम, बुलढाणा भागात आर्द्रता दिसून येत आहे. मात्र २४ तासात त्यात बदल हाेत उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
उष्ण लाटांची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ ते ९ एप्रिलदरम्यान गुजरातचे साैराष्ट्र, कच्छ ते राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि महाराष्ट्राचे काेंकण-गाेवा येथे उष्ण लाटांची शक्यता आहे. त्यांच्या झळा विदर्भावर बसतील, अशी शक्यता आहे.
१० एप्रिलपासून पुन्हा अवकाळीचे ढग
१० एप्रिलदरम्यान देशातील वातावरण पुन्हा बदलून अवकाळीचे ढग दाटण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, साेसायट्याचा वारा व वादळी हवामानासह हलका पाऊसवही हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हे वातावरण पुढे तीन चार दिवस राहिल, असा अंदाज आहे.