नागपूर : गुरुवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले हाेते, त्यामुळे सकाळपासून चटक्याऐवजी गारवा जाणवत हाेता. हवामान विभागाने किमान आठवडाभर म्हणजे १३ एप्रिलपर्यंत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विजा व गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाची शक्यता वर्तविली आहे.
भारताच्या दक्षिणेकडे शेजारी-शेजारी दाेन उच्च दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तर कर्नाटकाकडे तयार झालेले सायक्लाेनिक सर्क्युलेशन दक्षिण तमिळनाडूच्या वेल्लाेरपर्यंत सरकत असून याचा चक्राकार गतीचा आस तयार झाला आहे. वारा खंडितता प्रणालीद्वारे चक्राकार पद्धतीने चक्रीय वारे वाहत असून ते बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील आर्द्रता घेऊन वाहत आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रावर ढगाळ वातावरणासह अवकाळीचे सावट पसरले आहे.
पुढचे दाेन दिवस म्हणजे ७ व ८ एप्रिल राेजी तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस व गारपिटीचीही शक्यता आहे. मात्र, विजांचा कडकडाट व वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे अधिक नुकसान हाेण्याची शक्यता आहे. हा जाेर विदर्भात अधिक असेल पण विदर्भात गारपिटीची शक्यता कमी आहे.
दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे नागपूरचे कमाल तापमान १.२ अंशाने खाली घसरून ३७.४ अंशावर आले, जे सरासरीपेक्षा २.२ अंशाने कमी आहे. गडचिराेलीत सर्वांत कमी ३४ अंश तापमानाची नाेंद झाली. मात्र अकाेला, चंद्रपूर, ब्रह्मपुरीत पारा ४० अंशावर पाेहोचला आहे. अमरावती, गाेंदियात ३८ अंश तर वर्धा, वाशिम, यवतमाळात ताे ३९ अंशाच्यावर गेला आहे. गुरुवारी रात्रीचे किमान तापमान मात्र वाढले आहे. वर्ध्यात सर्वाधिक २६.८ अंशावर तर चंद्रपुरात ते २५ अंशावर आहे. नागपूरचे किमान तापमान २३.५ अंश नाेंदविण्यात आले. ढगाळ वातावरणामुळे पुढचे तीन दिवस कमाल व किमान तापमानात घसरण हाेण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र पारा वाढेल, असे वर्तविण्यात येत आहे.