नागपूर : चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने रविवारी नागपूरला चांगलाच धुमाकूळ घातला. दुपारी शहरात काही भागांत जाेरात, तर काही ठिकाणी किरकाेळ पाऊस झाला. दुसरीकडे जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळीने चांगलाच कहर केला. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे काही तालुक्यांतील शेकडाे हेक्टरमधील पिकांचे माेठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या चार-पाच दिवसांपासून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. विदर्भात याचा प्रभाव अधिक आहे. रविवारीही ही स्थिती कायम हाेती. नागपूर जिल्ह्यात शनिवारी दिवसा व रात्री काही ठिकाणी किरकाेळ, तर काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. रविवारी सकाळी काहीसी उघडीप हाेती; पण आकाशात ढग कायम हाेते. दुपारी वातावरण बदलले आणि अचानक जाेराच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. शहरातील काही भागात जाेरात, तर तुरळक ठिकाणी किरकाेळ सरी पडल्या. दरम्यान, नागपूर शहरात कुठलेही नुकसान झाल्याची नाेंद नाही.जिल्ह्यात मात्र शेतातील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांना अवकाळीने प्रभावित केले. यामध्ये काटाेल, कळमेश्वर, नरखेड, माैदा व कुही तालुक्यांतील अनेक गावांमध्ये गारपिटीने कहर केला. त्यामुळे उशिरा पेरणी केलेला गहू, हरभरा ही पिके अक्षरश: झाेपली. दुसरीकडे संत्रा व माेसंबीचा आंबिया बहार गळून पडला. आंब्यासह इतर फळबागांनाही या वादळी पाऊस व गारपिटीची फटका बसला आहे. साेबतच टाेमॅटाे, फूलकाेबी, पत्ताकाेबी, कांदा, मिरची यासह इतर भाजीपाला पिकांची माेठी नासाडी झाली आहे. त्यामुळे हाताताेंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या तालुक्यांना फटका नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यात आठ ते दहा, काटाेल तालुक्यातील १८ ते २० गावे, कळमेश्वर तालुक्यातील ३७, माैदा तालुक्यातील १० ते १२, रामटेक तालुक्यात ६ ते ८ आणि कुही तालुक्यातील ८ ते १० गावांना फटका बसला आहे. या गावांमध्ये शेकडाे हेक्टरमधील पिकांची नासाडी झाली आहे. मात्र, जिल्ह्यात कुठेही वीज काेसळून जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अमरावती जिल्ह्यात तीन दिवसांत २१०० हेक्टरमधील पिके गारद
अमरावती शहरात रविवारी दुपारपर्यंत सूर्यप्रकाश असताना साडेचारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. तासभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यादरम्यान बोराएवढी गार पाच मिनिटांपर्यंत पडली. मात्र, कुठेही नुकसान झालेली नाही. रात्रीच्या वादळात शेगाव ते रहाटगाव मार्गावर एक झाड विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेला पाऊस व गारपिटीमुळे दुचाकीस्वारांनी कडेला आश्रय घेतला. चिखलदरा येथेही दुपारी पावसासह गारपीट झाल्याचे वृत्त आहे. तीन दिवस झालेल्या गारपिटीमुळे पाच तालुक्यांतील २१०० हेक्टरमधील गहू, हरभरा, कांदा, टरबूज व संत्रा पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.
भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून पाच बकऱ्यांचा मृत्यू, दोघे जखमी
भंडारा जिल्ह्यात रविवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. पावसासोबत आलेल्या वादळामुळे काही ठिकाणी झाडेही पडली. शेतीचेही मोठे नुकसान झाले.
पवनी तालुक्यातील कुर्झा येथे वीज पडून पाच शेळ्यांचा मृत्यू झाला तर गुराख्यासह दोघे जखमी झाले. रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या मका, गहू, हरभरा या पिकांचेही नुकसान झाले. विशेषतः पपई आणि केळीच्या बागांनाही मोठा फटका बसला. वादळामुळे झाड विजेच्या तारांवर पडल्याने भंडारा शहरात काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, अर्ध्या तासाच्या काळात सरासरी २० ते ३० मिमी पाऊस पडला. काही ठिकाणी १० मिनिटे ते अर्धा तास असा पाऊस झाला. भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर या तालुक्यांमध्ये गारांचा पाऊस झाला. पवनीसह लाखांदूर तालुक्याच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली.
अकाेला, बुलढाण्यात पिकांचे मोठे नुकसान...
अकोल्यात गत तीन दिवसांपासून वऱ्हाडात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अकाेला जिल्ह्यातील पातूर, बार्शीटाकळी व तेल्हारा तालुक्यांत अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव झाला असून, त्यामुळे तब्बल १ हजार ७२८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांत जाेरदार पाऊस झाला. पातूर तालुक्यातील पांगरताटी, आलेगाव, उंमरवाडी, पिंपरडोली, राहेर, उमरा आदी गावांमध्ये गारा पडल्या. पातूर तालुक्यातील भंडारज बु. व भंडारज खु. या गावांतील रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, हायब्रीड ज्वारी, फळबाग, लिंबू पिकांचे नुकसान झाले. बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील रिंगणवाडी शिवारात वीज अंगावर पडल्याने गायीचा मृत्यू झाला. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशासह अनेक गावांमध्ये गारपीट झाली.
रात्रीचा पारा घसरला; वादळ वारे, वीज गर्जना पुन्हा दोन दिवस
दरम्यान, हवामान विभागाने १९ मार्चपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याचा इशारा दिला हाेता. मात्र, बदललेली परिस्थिती पुन्हा दाेन दिवस कायम राहणार आहे. २० व २१ मार्चपर्यंत विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळासह तुरळक पाऊस हाेण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे. शनिवारी रात्री चंद्रपूर व गडचिराेलीत १० व १६.४ मिमी पावसाची नाेंद झाली. इतर जिल्ह्यांतही वादळासह तुरळक पाऊस झाला. पावसाळी वातावरणामुळे दिवसा व रात्रीच्या तापमानात घसरण झाली आहे.
या कारणाने पाऊस पूर्वाेत्तरकडून वाहणारा पश्चिमी झंझावात सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या झंझावाताचा ट्रफ दक्षिण आंतरिक कर्नाटकाकडून पूर्व विदर्भाकडे तसेच उत्तर कर्नाटक व मराठवाड्याकडे सरकत आहे. दुसरीकडे पूर्वी राजस्थान व पश्चिमी मध्य प्रदेशात समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचावर सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. या प्रभावाने विदर्भासह इतर ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे.