नागपूर : अवकाळी पावसाने वातावरणात गारठा वाढवला आहे. नागपुरात काश्मीर-शिमल्याचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.मंगळवारी दिवसभर आकाशात काळ्या ढगांची गर्दी होती. सकाळी ६ पासून सुरू झालेला पाऊस दुपारी १२ पर्यंत सुरू राहिला. गेल्या २४ तासांत नागपुरात ४६.२ पावसाची नोंद झाली. यासोबतच कमाल तापमनात १२ अंशाची घट होऊन पारा १९ अंशापर्यंत घसरला. दिवसाच्या तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे. दरम्यान, हवामान खात्याने २९ व ३० नोव्हेंबर रोजी येलो अलर्ट जारी केला असून, या काळात पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मंगळवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवस व रात्रीच्या तापमानात २८ अंश सेल्सिअसचा फरक राहिला. तापमानात दोन अंशाची घट होऊन पारा १६.२ अंशावर पोहोचला. हवामान खात्यानुसार १ डिसेंबरनंतर आकाश स्वच्छ राहील. यानंतर रात्रीच्या तापमानात घट होऊ शकते. सद्य:स्थितीत अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सोबतच राजस्थान व पश्चिम मध्य प्रदेशात चक्रीय वादळ तयार झाले आहे. यामुळे नागपूरसह पूर्ण विदर्भातपाऊस पडत आहे. दिवसभर पाऊस व ढगाळ वातावरणामुळे दृश्यता ५०० हून १ हजार मीटरवर जाऊन पोहोचली आहे. सामान्यपणे दृश्यता २ ते ४ किमी असते.
नागपूर थंड, पण दुसऱ्या स्थानी
विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत पाऊस पडला आहे. त्यामुळे तापमानात सरासरी ७ ते १२ अंशांची घट झाली आहे. विदर्भात १८.५ अंश तापमानासह यवतमाळ सर्वांत थंड राहिले. १९ अंशांसह नागपूर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अमरावतीचे तापमान १९.८ तर गोंदियाचे तापमान १९.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
विदर्भात सर्वत्र पाऊस
- विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यांत पाऊस पडला. वर्धा ४६.३ मिमी, अकोला ४२.६, अमरावती ३४.६, बुलढाणा ३२, ब्रह्मपुरी ४, चंद्रपूर ३१.४, गोंदिया २३, वाशिम ३६, यवतमाळ १५.१ मिमी पावसाची नोंद झाली.