नागपूर : महानगरपालिकेने मागील ५ वर्षांमधील शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढविणाऱ्या घटकांचा अभ्यास केला. यात ‘हाउस इंडेक्स’ म्हणजे डेंग्यू डास असलेल्या घरांचे प्रमाण आणि ‘कंटेनर इंडेक्स’ म्हणजे, डेंग्यूच्या अळ्या असलेले पाण्याचे साठे हे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे पुढे आले. महत्त्वाचे म्हणजे, निरीक्षणात अवकाळी पाऊस झाल्यास डेंग्यूचा धोका वाढत असल्याचेही दिसून आले.
मनपाचे मलेरिया अधिकारी डॉ. जस्मीन मुलानी यांनी संशोधक पथकाच्या मदतीने हा अभ्यास यशस्वीपणे पूर्ण केला. राज्यात मनपाने केलेला डेंग्यूवरील हा पहिला अभ्यास असल्याचे बोलले जात आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्या मार्गदर्शनात या पथकामध्ये मेयोच्या श्वसनरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा, आरोग्य सेवाचे (हिवताप) सहायक संचालक डॉ. श्याम निमगडे व मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार आदींचा समावेश होता.
-५ वर्षांत २,४७० डेंग्यूचे रुग्ण
२०१८ ते २०२२ या कालावधीतील २ हजार ४७० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. डेंग्यू पॉझिटिव्हिटीचा दर ६.४ टक्के ते २४.३ टक्क्यांदरम्यान होता.
-असा केला अभ्यास
या अभ्यासात डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या विविध पर्यावरणीय घटक आणि सार्वजनिक आरोग्य उपायांचे परीक्षण करण्यात आले. यात असे आढळून आले की, पाणी साठविण्याच्या कंटेनरमधून व घरात साठवून ठेवण्यात आलेल्या विशेषत: कूलरमधून डेंग्यू डासांच्या अळ्यांची मोठ्या प्रमाणात पैदास होते.
-कंटेनर, हाउस इंडेक्स जितके जास्त तितके डेंग्यूचे रुग्ण अधिक
डेंग्यूला कारणीभूत असलेल्या एडिस डासांची घनता, डासांच्या अळ्या असलेल्या पाण्याच्या कंटेनरची संख्या, डासांच्या अळ्या असलेल्या घरांची संख्या आणि परिसरातील पावसाचे प्रमाण यावर डेंग्यूचा प्रादुर्भाव अवलंबून असतो. यातही महत्त्वाचे म्हणजे, कंटेनर इंडेक्स आणि हाउस इंडेक्स जितके जास्त तितके डेंग्यूचे रुग्ण अधिक असल्याचा निष्कर्ष निघाला.
-अवकाळी पावसाने वाढविले रुग्ण
पथकाने २०२० ते २०२२ या तीन वर्षांतील अवकाळी पावसाचाही अभ्यास केला. यातील निरीक्षण असे होते की, ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या ७०.३ मिमी अवकाळी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे १६, ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या ६.३ मिमी अवकाळी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे ६, तर ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या १३८.८ मिमी अवकाळी पावसामुळे डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळून आले.
-गप्पी माश्यांचा वापर प्रभावी
पाण्याचे कंटेनर कमी केल्यास किंवा आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळल्यास किंवा पाण्याच्या कंटेनरमध्ये गप्पी मासे सोडल्यास डेंग्यू डासांची संख्या कमी करता येऊ शकते.
-१,९४,६९८ डेंग्यूचे कंटेनर
मागील ५ वर्षांत शहरात डेंग्यूच्या अळ्या असलेले १ लाख ९४ हजार ६९८ कंटेनर आढळून आले. एक हजार रुग्णांमागे डेंग्यूशी संबंधित जवळपास ४ मृत्यू झाले.