नागपूर : महानगरपालीकेने मागील ५ वर्षामधील शहरातील डेंग्युचा प्रादूर्भाव वाढविणाऱ्या घटकांचा अभ्यास केला. यात ‘हाऊस इंडेक्स’ म्हणजे डेंग्यू डास असलेल्या घरांचे प्रमाण आणि ‘कंटेनर इंडेक्स’ म्हणजे, डेंग्यूच्या अळ्या असलेले पाण्याचे साठे हे डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे पुढे आले. महत्त्वाचे म्हणजे, निरीक्षणात अवकाळी पाऊस झाल्यास डेंग्यूचा धोका वाढत असल्याचेही दिसून आले.
मनपाचे मलेरिया अधिकारी डॉ. जस्मीन मुलानी यांनी संशोधक पथकाच्या मदतीने हा अभ्यास यशस्वीपणे पूर्ण केला. राज्यात मनपाने केलेला डेंग्यूवरील हा पहिला अभ्यास असल्याचे बोलले जात आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्या मार्गदर्शनात या पथकामध्ये मेयोच्या श्वसनरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा, आरोग्य सेवाचे (हिवताप) सहायक संचालक डॉ. श्याम निमगडे व मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार आदींचा समावेश होता.
- ५ वर्षांत २४७० डेंग्यूचे रुग्ण
२०१८ ते २०२२ या कालावधीतील डेंग्यू रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. या ५ वर्षांत १७ हजार ३०६ ‘आयजीएम एलायझा’ चाचणी करण्यात आल्या. यात २ हजार ४७० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. डेंग्यू पॉझिटिव्हीचा दर ६.४ टक्के ते २४.३ टक्केदरम्यान होता.
- असा केला अभ्यास
या अभ्यासात डेंग्यूचा प्रसारास कारणीभूत ठरणाºया विविध पर्यावरणीय घटक आणि सार्वजनिक आरोग्य उपयांचे परीक्षण करण्यात आले. यात असे आढळून आले की, पाणी साठविण्याच्या कंटनेरमधून व घरात साठवून ठेवण्यात आलेल्या विशेषत: कुलरमधून डेंग्यू डासांच्या अळ्यांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असल्याचे दिसून आले.