नागपूर : सकाळपासून उन्हाचा तडाखा, दुपारी ऊन-सावलीचा खेळ आणि दुपारनंतर ४ वाजताच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आल्याने दिवसाच अंधार पडला. वादळी वारा सुटून बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळला. काही भागांत झाडे उन्मळून पडली. अकाली झालेल्या पावसामुळे भालेभाज्यांसह शेतात कापून ठेवलेला गहू, चना भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत पाऊस सुरू झाला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागानुसार मध्य प्रदेशपासून ते दक्षिण तामिलनाडूपर्यंत विदर्भ मराठवाडा, कर्नाटकमध्ये हवेत ‘डिस्कंटिन्यूटी’ची चिन्हे आहेत. सोबतच राजस्थानमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळेच नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता आहे. नागपुरात ९ एप्रिलपर्यंत आकाशात ढगांची गर्दी राहील व पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शुक्रवारी नागपुरात सायंकाळी ५.३० पर्यंत ११.८ मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भात बुलढाणा ३४ मिमी, अमरावती ६ मिमी, वर्धा-यवतमाळ ५ मिमी व अकोला येथे २ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे रात्रीच्या तापमानात काहीअंशी घट झाली. नागपुरात रात्रीचे तापमान १.६ अंशाने कमी होऊन २१.९ अंशांवर आले.
२४ तासांतच ७० टक्के पावसाची नोंद
- एप्रिल महिन्यात नागपुरात सरासरी १९.४ मिमी पाऊस पडतो. मात्र, गुरुवारसह शुक्रवारीही पावसाने दमदार हजेरी लावल्याने १३.६ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने एप्रिलचा ७० टक्के कोटा पूर्ण केला.
एप्रिलच्या शेवटी सूर्य तळपणार
- हवामान विभागानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नागपुरात सूर्य तळपण्याची चिन्हे आहेत. जूनपर्यंत प्रचंड उकाडा राहील. मार्चमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, पारा ३९ अंशांवरच स्थिरावला.
भंडारा जिल्ह्यातील भंडारासह, मोहाडी, पवनी, तुमसर या तालुक्यांतील अनेक गावांना शुक्रवारच्या अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे शेतमालाचे विशेषतः भाजीपाल्याचे अधिक नुकसान झाले. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, तिरोडा, सडक अर्जुनी, गोंदिया परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळामुळे काही दुकाने व घरांचे छत उडाल्याची माहिती आहे.
अमरावती, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील अवकाळी पावसाने हजेरी लावली. अमरावतीत शुक्रवारी दुपारी १ वाजता अचानक आभाळ भरून आले व सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटात तासभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात शुक्रवारी वादळासह तासभर पाऊस पडला.
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सोंडी गावानजीक असलेल्या शेतात वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काही भागात उभा असलेल्या गहू पिकाचे पावसामुळे नुकसान झाले तर भाजीपाला पिकालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यांत पावसाने मोठे नुकसान केले. नेर तालुक्यात गारपीट झाली. तर महागाव तालुक्यात वीज पडून तीन जनावरे ठार झाल्याची घटना घडली. काही ठिकाणी टिनपत्रे उडून गेली. यात उन्हाळी भाजीपाला आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी यवतमाळ, नेर, बाभूळगाव आणि महागाव तालुक्यात दुपारी पाऊस बरसला. यात नेर मधून वाहणाऱ्या मिलमिली नदीला धुवाधार पावसामुळे पूर आला. याठिकाणी बोराच्या आकाराची गार बरसली. महागाव तालुक्यातील पेढी आणि संगम याठिकाणी वीज कोसळून एक गाय आणि दोन बैल ठार झाले. या पावसाने काढणीला आलेला गहू, कांदा, फुल आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.
- कुही तालुक्यातील नवेगावरोडवर झाडे पडली वादळी पावसाने बुढ्ढे ले आउट नवेगाव रोडवरील झाडे पडली. शेतकऱ्यांनी शेतात वाळायला ठेवलेली लाल मिरची पावसामुळे भिजली.
- कळमेश्वर तालुक्यात तोंडाखेैरी, धापेवाडा, वाढोणा, झुनकी, बोरगाव आदी भागात शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेला चना भिजून नुकसान झाले.
- सावनेर भागात शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान झाले.