नागपूर : मागील १२ तासात नागपूरसह विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस(untimely rain) बरसला. यामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून पुन्हा पुढचे दोन दिवस पावसाचे असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपुरात रविवारी सकाळपासूनच आकाशात ढग होते. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शहरातील काही भागात पाऊस आला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे दुपारनंतर शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला.
ढगाळलेल्या वातावरणामुळे मागील २४ तासात नागपुरातील थंडीत घट झाली. पारा किंचित चढल्याने १८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद शहरात झाली. विदर्भात सर्वच ठिकाणी २४ तासातील तापमान किंचित वाढलेले होते. मात्र पावसामुळे दिवसा थंडी जाणवत होती.
मागील २४ तासात अमरावतीमध्ये २८.२ मिमी, अकोला १ मिमी, तर वर्धा येथे मागील १२ तासात १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात पिकांचे नुकसान
भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गोंदियात १५ ते २० मिनिटे झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिके आणि भाजीपाल्याला बसण्याची शक्यता आहे. तसेच सध्या खरीप हंगामातील धानखरेदी सुरू असून मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसल्याची माहिती आहे.
भंडारा, लाखनी, साकोली, पवनी परिसरात बरसलेल्या पावसाने रब्बी पिकांसह भाजीपाला पिके संकटात सापडली आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातही पाऊस बरसला. या पावसाने लाख, लाखोळी, उडीद, हरभरा या कठाण पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान
नागपूर ग्रामीणमध्ये कळमेश्वर, नरखेड, कामठी, उमरेड, रामटेक या पाच तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस पडला. यामुळे गहू, हरभरा, तूर या पिकांसह काही प्रमाणात कापसाला फटका बसला. तर संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
पिंपळगाव निपानीत छप्पर उडाले
पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपानी येथे रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. यावेळी वादळामुळे घराचे तर काही ठिकाणी पानठेल्यावरील पत्रे उडून गेली. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची धांदल उडाली.