नागपूर :हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाने विदर्भात जोरदार हजेरी लावली. आज नागपुरस जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला. काही ठिकाणी गारपीटही झाली चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी बरसत आहे.
'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे सध्या विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने रविवारपासून वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पाऊस सुरुच आहे. यामुळे, रब्बी पिके आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर, पुढील तीन दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. शुक्रवारनंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
बल्लारपुरात वादळी पावसासह गारपीट
बल्लारपुरात सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वादळी पावसासह जोरदार गारपीट झाली. वादळामुळे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा बंद झाला. तालु्क्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. दरम्यान, रात्री अचानक जोरदार वादळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. रात्री ९.३० वाजेपर्यंत शहरात रिमझिम पाऊस सुरुच होता.
गडचिरोली जिल्ह्यात अवकाळीचा धुमाकूळ सुरुच
गडचिरोली जिल्ह्यात रविवारच्या रात्रीपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी बऱ्याच भागात अधूनमधून पाऊस सुरूच होता. रबी हंगामातील भाजीपाला व इतर पिकांचे या पावसामुळे नुकसान झाले. मंगळवारीही पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, जिल्ह्यात गारपीट किंवा वीज पडून दुर्घटना झाल्याची नोंद नाही.