लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : मागील वर्षी संत्र्यांच्या अंबिया व मृग बहराचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी मृग बहराच्या संत्र्यांचे चांगले उत्पादन हाेण्याची आशा पल्लवित झाली हाेती. मात्र, एप्रिल व मेमध्ये काेसळलेल्या अवकाळी व मान्सूनपूर्व पावसामुळे संत्रा बागांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ताण पडला नाही. त्यामुळे संत्र्याच्या मृग बहराच्या फुटीवर विपरीत परिणाम हाेऊ शकताे, अशी माहिती काटाेल येथील प्रादेशिक फळ संशाेधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली आहे.
यासंदर्भात डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात पाेषक हवामान निर्माण हाेत नसल्याने संत्र्याच्या झाडाला नवीन फूट येत नाही. नवीन वाढीसाठी लागणारी साखर या काळात शिल्लक राहून त्याचा झाडांच्या फांद्यांमध्ये संचय हाेताे. हवामान अनुकूल असल्यास जून-जुलैमध्ये मृग बहराची तर ऋतू बदल झाल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अंबिया बहराची फूट हाेते. त्यासाठी प्रथम फांद्यांमध्ये अन्नद्रव्यांचा संचय हाेणे आवश्यक असते. या काळात झाडांना ताण बसल्यास मृग अथवा अंबिया बहराची चांगली फूट हाेते.
अवकाळी पाऊस येऊन गेल्यास तसेच झाडांची २० ते २५ टक्के पानगळ न झाल्यास सर्वप्रथम जमिनीची उभी व आडवी वखरणी करावी. संत्रा व माेसंबीच्या झाडांवर लिव्हाेसिन हारमाेनची फवारणी करावी. हे वाढवर्धक असल्याने झाडे फुटण्यास मदत हाेते. १५ ते २० जूननंतर तसेच जुलै व सप्टेंबरमध्ये झाडांना रासायनिक खतांच्या अर्थात एक किलाे नत्र व अर्धा किलाे स्फूरद या प्रमाणात दाेन मात्रा द्याव्या. त्यानंतर प्रत्येक झाडाला ३० ते ५० किलाे शेणखत द्यावे. या शेणखतात ट्रायकाेडर्मा हर्जालियम मिसळवावे. पालाशची मात्रा जमिनीच्या परिक्षणानुसार द्यावी. जूनमध्ये पाऊस न आल्यास झाडांना थाेडे पाणी द्यावे. फळधारणा झाल्यानंतर ती टिकवण्यासाठी झाडांवर नत्र व प्लॅनाेफिक्सची फवारणी करावी, असा सल्लाही कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांना दिला आहे.
....
चुनखडीमुळे झाडांना कमी ताण
विदर्भातील माती काळी व भारीची असून, चिकन माती दाेन ते तीन फुटांपर्यंत आहे. शिवाय, या जमिनीत चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे संत्रा झाडांना ताण कमी बसताे. त्यात अवकाळी पाऊस आल्यास किंवा मान्सूनचा पाऊस ९० मिमीपेक्षा अधिक झाल्यास झाडांना पुरेसा ताण बसत नाही. जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यास झाडांचा तंतुमय (मुळांचा जाळवा) सडताे, असेही डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले.