लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरासह नरखेड आणि कामठी तालुक्यात गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. तीन तासांत ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मालाची नासाडी झाली. गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
नागपुरात सकाळी ७ नंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. वेधशाळेने केलेल्या नोंदीनुसार, ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात सकाळी जोरदार, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही तालुक्यांत तुरळक पाऊस झाला. मात्र, काटोल आणि नरखेड तालुक्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही किरकोळ पावसाची नोंद झाली. कामठी तालुक्यात काही गावांमध्ये तसेच नरखेड तालुक्यात जलालखेडा आणि मेंढला येथे चांगला पाऊस झाला. यामुळे गहू आणि हरभरा या पिकांचे चांगलेच नुकसान झाले. खांबाडा, खडीपौनी, कलानगोंदी या गावांमध्येही जोरदार पाऊस झाला. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. जोराच्या वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर गळाल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
...
शेतीला फटका
नरखेड तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पिकांचे मोठे नुकसान झाले. सकाळी ७ च्या सुमारास तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतात कापून ठेवलेल्या चणा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी चण्याचे पीक कापणीला आले आहे, तर काही ठिकाणी जमिनीवर कापून टाकले आहे. गहू, चणा, भाजीपाला, पिकाला मोठा फटका बसला. बुधवारी रात्रीपासून नरखेड तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी अंबाडा, थंडीपवनी, तारा उतारा, खलानगोंदी परिसरात जोरदार पाऊस झाला. दिवसभर ढगाळलेल्या वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता. शासनाने तातडीने पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
...
कोट
गतवर्षी कोरोनामुळे त्रस्त झालो होतो. परत कोरोनाची दुसरी लाट उसळली. आता तर अवकाळी पाऊसही पाठ सोडत नाही. गहू, चणा, पालेभाज्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदत द्यावी.
- मिथून कठाने, शेतकरी तारा (जलालखेडा)
...
वातावरण थंडावले
ढगाळी वातावरणामुळे आणि पावसामुळे शहरातील वातावरण बदलले असून, तापमानही खालावले होते. सकाळी १० नंतर पाऊस गायब झाला. नागपुरातील तापमानाच ५.२ अंश सेल्सिअसची घट होऊन तापमान ३१.६ अंश सेल्सिअसवर आले. चंद्रपूरातील तापमानही ४.८ अंशाने खालावून ३३.६ अंश सेल्सिअसवर आले. अकोला, वाशिम, गडचिरोली यवतमाळ वगळता सर्वच जिलह्यात तापमान खालावले होते. गोंदीयामध्ये ३२ अंशाची तर वर्धामध्ये ३५.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.
...
आज वादळी पाऊस
वेधशाळेने पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला असून, १९ मार्चला वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा दिला आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळाचा वेग असेल, असेही वर्तविण्यात आले आहे. नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा या चार जिल्ह्यांना सावधगिरीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. २० तारखेलाही विदर्भातील सर्वच जिल्ह्यात गेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
...