संजय भाकरे फाऊंडेशनचा उपक्रम नागपूर : आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या आजच्या उच्चशिक्षित तरुणाईसमोरील अनेक समस्यांना अधोरेखित करणारे तसेच भरगच्च पगाराचे आमिष दाखविणाऱ्या आजच्या कार्पोरेट कंपन्यांकडून प्रत्यक्षात भ्रमनिरास होणाऱ्या उमेदवारांच्या विफल मानसिकतेवर प्रकाश टाकणारे ‘प्रश्नचिन्ह’ हे नाटक साईकृपा मंगल कार्यालय, धंतोली येथे आज सादर करण्यात आले. भाजप जनता पार्टी व संजय भाकरे फाऊंडेशनच्यावतीने ही एकांकिका सादर करण्यात आली. आजच्या धावपळीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या काळात उच्चशिक्षित तरुणांना अशा कार्पोरेट जगात अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. अनेक विदारक अनुभवांचा सामना करावा लागतो. अनेक मानसिक व शारीरिक समस्यांचा बळी ठरावे लागते. या वास्तविकतेला मांडणारे हे सादरीकरण होते. नवोदित कलावंतांनी आपल्या अभिनयाचा कस यावेळी लावला. अशा प्रकारच्या नोकऱ्यांच्या कठीण अनुभवानंतर मिळणाऱ्या नोकरीबद्दलची कुठलीच शाश्वती नसते. उद्याच्या प्रगतीबद्दल कायम अधांतरी असणाऱ्या या नव्या पिढीतील तरुणांच्या कायम अस्वस्थ, अशांत आणि नैराश्यग्रस्त मानसिकतेचा वेध घेणारे हे नाटक उपस्थितांच्या अभिरुचीला आव्हान देणारे तसेच अशा अनुत्तरित सत्यानुभूतीसंदर्भात खरोखरीच अनुरुप अशा शिर्षकाप्रमाणे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे नाट्य होते. संहितेनुसार आपापल्या भूमिकेला यथोचितपणे सादर करण्याचा प्रयत्न सहभागी कलावंतांनी केला. या उपक्रमाला प्रोत्साहन देणारे संयोजक संजय भाकरे आणि कुणाल गडेकर, मार्गदर्शक ज्येष्ठ दिग्दर्शक गजानन पांडे आणि सहकाऱ्यांतर्फे आयोजित या नाटकाला दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी रवींद्र फडणवीस, पत्रकार प्रभाकर दुपारे, शैलेश अनखिंडी, बबलु देवतळे, अबोली केळकर, दिलिप देवरणकर, अमेय देशमुख, सीमा गोडबोले, कल्याणी गोखले, रेणुका चुटे, केतकी कुळकर्णी, श्याम मोहरील, विनय मोडक, अतुल सोमकुंवर, सांची जीवने, संजय जीवने, सलिम शेख, वैदेही चवरे यांना सन्मानित करण्यात आले. नाटकातील सहहभागी कलावंत आदित्य धुळधुळे, अंशुबुरी, अभिनव बारापात्रे, हिमानी निखाडे, अश्विनी गेडाम, कुणाल गोरले, योगेश धांडे होते. संगीत केयुर भाकरे आणि प्रथमेश देशपांडे, अबोली केळकर, मकररंद भालेराव, अमित अंबुलकर, मधुरा माने आदींनी नाटकासाठी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
तरुणाईचा अस्वस्थ हुंकार ‘प्रश्नचिन्ह’
By admin | Published: December 26, 2014 12:46 AM