नागपूर : आर्मी पोस्टल सर्व्हिस, कामठीच्यावतीने प्रहार जनजागृती संस्थेच्या कार्याचा गौरव म्हणून ‘माय स्पेशल स्टॅम्प’चे अनावरण करण्यात आले.
प्रहार समाज जागृती संस्थेने २७ वर्षे युवकांमध्ये आणि समाजात सैनिक गुण प्रसारित करण्याचे कार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे संरक्षण दलांसाठी आतापावेतो ३०९ प्रहारी अधिकारी म्हणून तयार करून भारतीय सैन्यात पाठविलेले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात कर्नल विनोद कुमार, विंग कमांडर, आर्मी पोस्टल सर्व्हिस, कामठी यांच्या प्रास्ताविकाने झाली. कर्नल विनोद यांनी उपस्थितांना संवादापेक्षाही टपाल सेवेचे महत्त्व कसे जास्त चांगले आहे हे समजावून सांगत आणि कोविडच्या कठीण काळात टपाल सेवेने दिलेल्या आवश्यक व समर्पक कामगिरीची ओळख करून दिली.
प्रहार डिफेन्स अकादमीच्या विद्यार्थ्यांना यावेळेस टपाल सेवेच्या वस्तूंच्या सुरेख प्रदर्शनामधील सुगंधित टपाल तिकिटे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. बी आर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यावरील टपाल तिकीट दाखविण्यात आले तसेच आर्मी पोस्टल सर्व्हिसचा इतिहास, कार्य, कामगिरी यावर एक संक्षिप्त चित्रफीत दाखविल्या गेली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे, प्रहारच्या अध्यक्ष शमा देशपांडे, फ्लाईड लेफ्टनंट शिवाली देशपांडे (निवृत्त), चंद्रकांत देव, लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध देशपांडे (निवृत्त) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विंग कमांडर कर्नल विनोद कुमार यांनी केले.