नागपूर : स्क्रू ड्रायव्हर, पान्यांच्या साहाय्याने एटीएम मशीनच्या डिस्पेन्सरमधून रक्कम चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या आंतरराज्यीय टोळीला नागपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी नागपुरातील ३३ एटीएममध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली. याशिवाय मुंबई, पुण्यासह विविध राज्यांतदेखील या टोळीने चोरी केली आहे. तहसील पोलीस ठाण्यातील पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
सेंट्रल एव्हेन्यू येथईल गांधी पुतळ्याजवळील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून दोन अनोळखी व्यक्तींनी १५ ऑगस्टला पाच हजार रुपये चोरले होते. त्यांनी एटीएम डिस्पेन्सर स्क्रू ड्रायव्हरने तोडून नोटा काढल्या होत्या. या गुन्ह्याचा पोलीस तपास करीत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचे चेहरे आले होते. पोलिसांनी शहरातील इतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली व मोबाईल सर्व्हेलन्सचा वापर करून गोळीबार चौक ते टिमकी या मार्गावर राहुल सरोज (वय २४, प्रतापगढ), संजयकुमार पाल (२३, प्रयागराज) व अशोक पाल (२६, प्रयागराज) यांना मागील आठवड्यात ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हेच चोरी करणारे आरोपी असल्याची खात्री झाली. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे आठ हजारांची रोख, मोबाईल हँडसेट, फेविक्विक, चिमट्यासारखा दिसणारा लोखंडी पाना, स्क्रू-ड्रायव्हर आढळून आले. कोठडीत चौकशीदरम्यान ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली. सोबतच शहरातील ३३ एटीएममध्ये या पद्धतीने चोरी केल्याचेदेखील त्यांनी सांगितले. त्यांच्या टोळीतील विनोद सरोज (२५, प्रतापगड) व मोनू सरोज (२२, प्रतापगड) हे फरार आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक पोलीस आयुक्त संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, विनायक कोल्हे, संदीप बागुल, संजय शाहू, सुनील कुसराम, संदीप गवळी, संदीप पाटील, वैभव कुरसंगे, कृणाल कोरचे, महेंद्र सेलूकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चार राज्यांत चोरी
ही टोळी विविध राज्यांत जाऊन तेथील एटीएममध्ये चोरी करायची. महाराष्ट्रासह, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशातदेखील त्यांनी एटीएममधून रक्कम काढली. त्यांनी ही प्रणाली नेमकी कुठून शिकली, तसेच चोरीचा पैसा कुठे ठेवला आहे याबाबत चौकशी सुरू आहे.