नागपूर : फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून बदललेल्या वातावरणामुळे आता उष्णता जाणवायला लागली आहे. नागपुरातील वातावरणात कोरडेपणा निर्माण झाला असून सायंकाळच्या आर्द्रतेमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे.
नागपुरातील मंगळवारच्या कमाल तामपानाची नोंद ३७.७ अंश सेल्सिअस झाली आहे. मागील चार दिवसांपासून उष्णता वाढत असल्याने रात्रीची थंडी पळाली आहे. पहाटे असलेला गारवा सुखद असला तरी वाढत्या कोरोना संक्रमणामुळे अधिकाधिक सुरक्षा घेताना नागरिक दिसत आहेत. मंगळवारी सकाळी ४४ टक्के आर्द्रता नोंदविली गेली, तर सायंकाळी त्यात बरीच घट होऊन फक्त १३ टक्क्यांची नोंद झाली. वारे वाहत असल्याने वातावरण कोरडे झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत हा बदल जाणवत आहे.
चंद्रपुरात आतापासूनच उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. मंगळवारी विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अमरावती, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्याचे तापमानही नागपूरच्या बरोबरीनेच होते. फेब्रुवारीतील थंडीनंतर अचानक वातावरण तापायला लागल्याने सुरुवातीचे हे दिवस अनेकांना त्रासदायक ठरत आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ३ मार्चपासून हवामान अधिक कोरडे राहणार असल्याने राज्यात उष्णतेचा पारा वाढत जाणार आहे. या बदलामुळे कुलर आणि एसीचा वापर नजीकच्या दिवसात वाढण्याची शक्यता आहे. थंड पाण्याचे माठही बाहेर निघत आहेत.