लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या चढाओढीनंतर बुधवारी पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत प्रचंड उलथापालथ झाली आहे. नियामक मंडळाने बहुमताने संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. मात्र, विशेषाधिकाराचा वापर करत विद्यमान अध्यक्षांनी १५ दिवसाचा वेळ मागून घेत वेळ मारून नेल्याचे सांगितले जात आहे.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद (नवनाथ) कांबळी यांच्या विरूद्ध नियामक मंडळात बऱ्याच दिवसांपासून असंतोष खदखदत होता. दोनच महिन्यापूर्वी कार्यकारिणीतील सतीश लोटके यांच्यासह काही सदस्यांनी कांबळी यांच्या धोरणाविरूद्ध चॅरिटी कमिश्नरकडे धाव घेतली होती. हे प्रकरण सुरू असतानाच मंडळातील असंतोष आणखीनच वाढत होता. त्याच अनुषंगाने बऱ्याच दिवसानंतर मुंबईत बुधवारी नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत २६ विरुद्ध १२ मतांनी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती अंतर्गत सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी मध्यस्ती करत विशेषाधिकारान्वये १५ दिवसात पुढची बैठक घेण्याची घोषणा केली असून, कार्यकारिणीला आता १५ दिवसात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या एकूणच प्रकरणामुळे मूळ हेतूवर राजकारण भारी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
अध्यक्षांचा राग कार्यकारिणीवर
प्रसाद कांबळी यांच्या एकाधिकारशाही विरोधात आग बऱ्याच काळापासून धुमसत होती. अडीच वर्षाच्या कार्यकाळात गेले दीड वर्ष ही आग हळूहळू वाढत असल्याचे दिसून आले. अखेर त्या विरोधात काही सदस्य कोर्टाची पायरी चढले होते. त्यानंतर नियामक मंडळाच्या अर्ध्याहून अधिक सदस्य कांबळी यांच्या विरोधात असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना पदच्युत करण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आल्याचे अंतर्गत सूत्र सांगत आहेत.
हा परिषदेला बदनाम करण्याचा डाव - प्रसाद कांबळी
अविश्वास ठराव मांडला गेला नाही तर कार्यकारिणी बरखास्त कशी होणार, असा प्रतिप्रश्न नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केला आहे. कार्यकारिणीला बरखास्त करण्याचा अधिकार चॅरिटी कमिश्नरला असून, हा केवळ नाट्य परिषदेला बदनाम करण्याचा डाव असल्याचे सांगत कांबळी यांनी कार्यकारिणी बरखास्त झाल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे.
.............