लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान पदकाच्या मुद्यावरुन गोंधळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. एका विद्यार्थिनीला पदक मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर ऐनवेळी तिच्या इतकेच गुण असलेल्या परंतु वय कमी असलेल्या विद्यार्थिनीला पदक देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुद्यावरुन गोंधळ झाला. तिच्या पालकांनी अतिथींच्या उपस्थितीतच यावर आक्षेप घेत विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.विजयश्री बजाज या हिस्लॉप महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला एम.ए. मानसशास्त्र विषयात सर्वाधिक ९.५९ ‘सीजीपीए’ मिळाल्यामुळे या विषयातील सुवर्णपदकाने तिला गौरविण्यात येईल असे पत्रक विद्यापीठाने तिला पाठविले. यासंदर्भात विद्यापीठाने संकेतस्थळावर यादी जाहीर केली होती व तेवढाच ‘सीजीपीए’ असलेल्या राचेल डेनिस पीटर्स या विद्यार्थिनीने त्यावर आक्षेप घेतला. दोन विद्यार्थ्यांना सारखा ‘सीजीपीए’ असल्यास जो विद्यार्थी वयाने लहान असेल त्याला सुवर्ण पदक देण्याचा विद्यापीठाचा नियम आहे. हेच कारण समोर करत विद्यापीठाने राचेल पीटर्स हिला पदक देण्याचे ठरविले. परंतु विजयश्री बजाजला याबाबत कळविण्यातच आले नाही. शनिवारी दीक्षांत समारंभाला ती पालकांसह आली असता तिला ही बाब कळली. विद्यापीठाने तिला आत प्रवेश नाकारल्याने हा तिच्यासोबत अन्याय असून याची माहिती का देण्यात आली नाही, असा संतप्त सवाल तिच्या पालकांनी उपस्थित केला. अखेर कुलगुरूंच्या परवानगीने विशेष बाब म्हणून विजयश्री बजाज हिला विशेष बाब म्हणून सारखा ‘सीजीपीए’ असतानाही पदक देऊन गौरविण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आणखी एका विषयात एकाच ‘सीजीपीए’चे तीन विद्यार्थी आहेत. आता त्या विद्यार्थ्यांनादेखील विद्यापीठ पदके देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दीक्षांतमध्ये पदकाच्या मुद्यावरुन गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 9:39 PM
नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान पदकाच्या मुद्यावरुन गोंधळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. एका विद्यार्थिनीला पदक मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर ऐनवेळी तिच्या इतकेच गुण असलेल्या परंतु वय कमी असलेल्या विद्यार्थिनीला पदक देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुद्यावरुन गोंधळ झाला.
ठळक मुद्देऐनवेळी दुसऱ्या विद्यार्थिनीला पदक देण्याचा निर्णय