अमेरिकन कंपनीचा गुंतवणुकीसाठी पुढाकार : दोन महिन्यात कामाला सुरुवात आनंद शर्मा नागपूरभारतात कोळशापासून युरिया बनविण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार वेगाने कामाला लागले आहे. अमेरिकेतील एका कंपनीने गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूरसह एका अन्य ठिकाणी कोळशापासून युरिया बनविण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यात प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री राहिलेले सध्याचे गृहराज्यमंत्री चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांनी सांगितले. ‘लोकमत’ शी चर्चा करताना अहीर म्हणाले की, केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री असताना कोळशापासून युरिया बनविणाऱ्या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चासुद्धा झाली होती. कोळशापासून युरिया बनविण्याच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाने सक्षम असलेल्या कंपनीला आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अमेरिकेतील एका नामांकित कंपनीने या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी रुची दाखविली आहे. या कंपनीला हे काम देण्याचे ठरले आहे. अहीर म्हणाले की दोन ठिकाणी कोळशावर आधारीत युरिया प्लॅन्ट लावण्यात येतील. मुबलक प्रमाणात चंद्रपुर येथे कोळसा उपलब्ध असल्याने चंद्रपूरला प्राथमिकता देण्यात येईल. कोळसा देण्यास वेकोलि तयारनागपूर : दुसऱ्या प्रकल्पाची जागा अद्यापही निश्चित झालेली नाही. या प्रकल्पाची अंदाजे किंमत जवळपास ६ हजार कोटी रुपये राहील. ४०० ते ५०० एकर परिसरात हा प्रकल्प होईल. प्रकल्पाची उत्पादन क्षमता १.२ मिलियन म्हणजे १२ लाख टन राहणार आहे. त्यासाठी वेकोलि कडून १.५ मिलियन म्हणजे १५ लाख टन कोळसा विकत घेण्यात येईल. कोळशावर आधारित युरिया प्रकल्पाचे काम दोन महिन्यात सुरू होण्याचे संकेत त्यांनी दिले. यासंदर्भात वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालन राजीव रंजन मिश्रा यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की कोळशावर आधारीत युरिया प्रकल्पासाठी वेकोलि नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून कोळसा देण्यास तयार आहे. कोल लिंकेजच्या माध्यमातून कोळसा दिल्या जाऊ शकतो. या मुद्यावर तत्कालीन केंद्रीय रसायन अणि उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासोबत दोन ते तीन वेळा चर्चा झाली आहे. त्यांनी कोळशावर आधारीत युरिया प्लॅन्टसाठी वेकोलि पुरेसा कोळसा देऊ शकते का,अशी विचारणा केली होती. (प्रतिनिधी)
कोळशापासून बनेल युरिया
By admin | Published: September 12, 2016 2:49 AM