नागपूर : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे प्रलंबित एका तक्रारीवर निर्णय देण्यास विलंब करीत होते. परंतु, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अवमान याचिका दाखल होताच ते सक्रिय झाले व त्यांनी संबंधित तक्रारीवर निर्णय दिला.
हे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार नगर परिषदेचे उपाध्यक्ष अतुल रघुवंशी यांच्याशी संबंधित आहे. त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्याविरुद्ध नगरसेवक आबिद हुसैन यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरील प्राथमिक सुनावणीनंतर रघुवंशी यांच्या निवडीवर अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. परंतु, पुढे तक्रारीवर तातडीने अंतिम निर्णय देण्यात आला नाही. परिणामी, रघुवंशी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात उच्च न्यायालयाने संबंधित तक्रारीवर आठ आठवड्यात निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. परंतु, शिंदे यांनी ती मुदत संपूनही तक्रारीवर निर्णय दिला नाही. त्यामुळे रघुवंशी यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यामध्ये उच्च न्यायालयाने तक्रारीवर निर्णय घेण्यास का विलंब होत आहे, अशी परखड विचारणा शिंदे यांना केली, तसेच तातडीने निर्णय न दिल्यास आवश्यक आदेश जारी करण्याची तंबी दिली. त्यानंतर शिंदे प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लगेच सक्रिय झाले व त्यांनी १६ सप्टेंबर २०२१ रोजी हुसैन यांची तक्रार गुणवत्तेवर सुनावणी घेतल्यानंतर खारीज केली. उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता शिंदे यांच्याविरुद्धची अवमान याचिका निकाली काढली. रघुवंशी यांच्यावतीने ॲड. अनिल ढवस यांनी बाजू मांडली.