कोळशापासून तयार करणार : राज्य सरकारने एमआयडीसीत जागा दिलीनागपूर : कोळशापासून युरिया तयार करण्याचा प्रकल्प भद्रावती येथे उभारण्यात येणार आहे. एका अमेरिकन कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. संबंधित कंपनी येथे तब्बल सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या दरापेक्षा अर्ध्या किमतीत युरिया देणे शक्य होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.गडकरी म्हणाले, देशात युरियाच्या उत्पादनावर प्रति टन २० हजार रुपये खर्च येत आहे. मात्र, कोळशापासून युुरिया तयार केला तर त्याची किंमत प्रति टन १० हजार रुपये पडते. विदर्भात कोळसा अतिरिक्त आहे. या कोळशाचा उपयोग युरिया निर्मितीसाठी केला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. हे विचारात घेऊन आपण केंद्रीय खते व रसायन मंत्री अनंतकुमार यांच्याशी चर्चा केली व त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे संबंधित प्रकल्प उभारण्यास संमती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी भद्रावती एमआयडीसीमध्ये जागा देऊ केली असून प्राथमिक सामंजस्य करारही करण्यात आला आहे. कोल लिंकसाठी वेस्टन कोलफिल्ड लि. ने होकार दिला आहे. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. ज्या प्रमाणे राज्य सरकार वीज खरेदीसाठी करार करते, त्याच धर्तीवर राज्य सरकारने युरिया खरेदी करार करावा, अशी सूचना गडकरी यांनी केली. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात स्वस्त युरिया उपलब्ध होईल. शेतकऱ्यांचा फायदा होईल. शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जंगलांमध्ये बांबू लागवडअगरबत्तीसाठी दरवर्षी ४० हजार कोटींचे लाकूड देशात आयात केले जाते. दुसरीकडे आपल्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिकामी आहे. या जागांवर बांबू लागवड केली जाईल व अगरबत्ती उद्योजकांना जंगलाच्या परिसरातच कारखाना उभारण्यासाठी जागा दिली जाईल. यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे, असे गडकरी यांनी सांगितले. बांबू हे गवत आहे. मात्र, वन विभागाने बांबू तोडण्यासाठी खूप अटी लावल्या आहेत. त्या शिथिल केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
भद्रावती येथे युरिया प्रकल्प
By admin | Published: October 17, 2016 2:47 AM