आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोळशापासून युरिया बनविण्याचा प्रकल्प भारतात पहिल्यांदा चंद्रपूर येथील भद्रावती येथे सुरू होणार आहे. यासाठी स्टोनटेक एनर्जी प्रा. लि. या कंपनीने तयारी दर्शविली आहे. उद्योग विभागाने या कंपनीला भद्रावती येथे जमीन आॅफर केली आहे. सोबतच वेस्टर्न कोल फिल्डला कोळसा देण्यासाठी तयार केले आहे. हैदराबाद येथील स्टोनटेक एनर्जी कंपनीकडून पर्यावरण व आर्थिक व्यवहाराचा अभ्यास करण्यात गुंतली आहे. अध्ययनाचे काम आॅगस्टपर्यंत पूर्ण होणार असून, आॅक्टोबरच्या शेवटी अथवा नोव्हेंबर महिन्यात प्रकल्पाच्या निर्माण कार्याला सुरुवात होणार असल्याची महिती कंपनीचे संचालक मारुती गुडी यांनी लोकमतला दिली.केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांनी कोळशापासून युरिया तयार करण्यासंदर्भातील संकल्पना सादर केली होती. यासंदर्भात त्यांची केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चाही झाली होती. त्यानंतर अमेरिकेतील एनव्हायर्नमेंटल एनर्जी अॅण्ड फायनान्स कार्पोरेशन लि. ची सहभागी कंपनी स्टोनटेक एनर्जी प्रा. लि. यांच्याशी प्रकल्पासंदर्भात चर्चा सुरू होती. ६ आॅक्टोबर २०१६ ला महाराष्ट्र सरकारने या कंपनीशी ‘एमओयु’ केला होता. त्यानंतर या प्रकल्पासंदर्भात कार्यवाही थांबली होती. आता कंपनीने परत आपल्या कार्याला गती दिली आहे. पर्यावरण व आर्थिक व्यवहारासंदर्भात कंपनीने अभ्यास सुरू केला असल्याची माहिती आहे. या प्रकल्पाची युरिया उत्पादनाची क्षमता १.२ मिलियन म्हणजेच १२ लाख टन राहील. यासाठी वेकोलिकडून १.५ मिलियन म्हणजेच १५ टन कोळसा घेण्यात येईल.
मागणी आल्यास कोळसा देऊकोळशावर आधारित युरिया प्रकल्पासाठी संबंधित कंपनीकडून अजूनही मागणी आलेली नाही. भविष्यात मागणी आल्यास वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडतर्फे प्रकल्पाला नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून कोळसा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोल लिंकेजच्या माध्यमातून कोळसा देत येईल. पण कोळशाची अचानक मागणी वाढल्यास पुरवठ्यात अडचणी येऊ शकतात.- राजीव रंजन मिश्र, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, वेकोलि.
कंपनीने हा प्रकल्प गंभीरतेने घेतला आहे. सरकारशी एमओयूसुद्धा झाला आहे. कंपनीचे अधिकारी पुढच्या आठवड्यात चंद्रपूरच्या दौऱ्यावर जाणार आहे. सध्या कंपनीचे अध्यापनाचे काम सुरू आहे. हे काम आॅगस्टपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर प्रकल्पाचे निर्माण कार्य सुरू करण्याची योजना आहे.-मारुती गुडी, प्रकल्प संचालक, स्टोनटेक एनर्जी
या प्रकल्पात ५०० लोकांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. या प्रोजेक्टसाठी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन सुद्धा प्रयत्नरत आहे. त्यासाठी स्टोनटेक एनर्जीच्या अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. या प्रकल्पातून चांगले रिटर्न कसे मिळतील याचे अध्ययन कंपनी करीत आहे.- मधुसूदन रुंगटा, अध्यक्ष,एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर
स्टोनटेक कंपनी व महाराष्ट्र सरकार यांच्यात एमओयु झाला आहे. उद्योग विभागाने कंपनीला भद्रावती येथे जमीन आॅफर केली आहे. परंतु अद्यापही जमीन घेण्यासाठी कंपनी पुढे आलेली नाही. कंपनीने मागणी केल्यास भद्रावती येथे जमीन उपलब्ध करून देण्यात येईल.प्रकल्पासंदर्भात माहिती
- महाराष्ट्र सरकार-स्टोनटेक एनर्जी यांच्यात एमओयू
- चंद्रपूरच्या भद्रावती येथे लागणार प्रकल्प
- प्रकल्पाचे लागत मूल्य ६५०० कोटी
- कोळशापासून बनेल १.२ मिलियन टन युरिया
- १.५ मिलियन टन कोळशाची आवश्यकता
- उद्योग विभाग जमीन देण्यास तयार
- आर्थिक व्यवहारासंदर्भात सुरू आहे कंपनीचा अभ्यास
- ए.पी. धर्माधिकारी, सहसंचालक, उद्योग विभाग