नागपूर : रेल्वे रिझर्व्हेशनचा फॉर्म भरत असलेल्या पित्याचे काहीसे दुर्लक्ष झाल्याची संधी साधून तीन वर्षीय चिमुकलीला उचलून पळ काढणारा आरोपी श्यामकुमार पुनितराम ध्रुव (वय ३०) सध्या रेल्वे पोलिसांच्या कस्टडीत आहे. मात्र, त्याने पोलिस कस्टडीत माैनीबाबांची भूमिका स्वीकारली आहे. गुन्ह्याच्या संबंधाने तो एकतर उलटसुलट उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो किंवा गप्प राहून पोलिसांचा बीपी वाढवतो आहे.
शनिवारी सकाळी १० च्या सुमारास इतवारी रेल्वे स्थानकाच्या रिझर्व्हेशन काउंटरसमोर अपहरणाची ही खळबळजनक घटना घडली होती. राजू दिलीप छत्रपाल (वय ३४) यांच्या उर्मी नामक तीन वर्षीय चिमुकलीचे आरोपी श्यामकुमार ध्रुव याने अपहरण केले होते. राजूने लगेच रेल्वे पोलिसांना या घटनेची तक्रारवजा माहिती दिली. त्यानंतर एपीआय पंजाबराव डोळे आणि सहकाऱ्यांनी तातडीने धावपळ करून मुख्य रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांच्या मदतीने आरोपी श्यामकुमार ध्रुव याला दोन तासांतच ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून उर्मीचीही सुटका केली. त्याला अपहरणाच्या आरोपाखाली अटक केली. तेव्हापासून पोलिस त्याची चाैकशी करीत आहेत.
दरम्यान, रविवारी त्याला न्यायालयात हजर करून रेल्वे पोलिसांनी त्याची २३ जूनपर्यंत कस्टडी मिळवली. त्यानंतर त्याला पुन्हा विचारपूस सुरू केली. मात्र, आरोपी अपहरणाचा उद्देश अन् इतर बाबीबद्दल काहीही बोलायला तयार नाही. उलटसुलट उत्तरे देतो आणि अनेक प्रश्नांना बगल देण्यासाठी गप्प राहणे पसंत करतो. त्यामुळे पोलिसांचा बीपी वाढला आहे. पोलिसांनी त्याचा छत्तीसगडमधून क्राईम रेकॉर्डही मागविला आहे.