मनपा आयुक्तांचे आवाहन : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सायकल रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरामध्ये पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत. नागरिकांनीही शारीरिक सुदृढतेसह पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सायकलचा वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने जागतिक कार फ्री दिनानिमित्त बुधवारी सिव्हिल लाईन्स येथील लेडीज क्लब येथे आयोजित सायकल रॅलीला राधाकृष्णन बी. यांनी हिरवी झेंडी दाखविली. महापालिका, नागपूर पोलीस, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नागपूर मेट्रो, मिल्स अँड मिलर्स, सायकल फॉर चेंज, इंडिया पेडाल्स, लाफ्टर रायडर अँड रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्तांनी नागरिकांना सायकलने प्रवास करण्याचे आवाहन केले. शहरात पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देऊन शहरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पुढाकार असल्याचे म्हटले. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनीसुद्धा पर्यावरणपूरक वाहनांचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे.
रॅलीमध्ये मनपा आयुक्तांनी सुद्धा सायकल चालवून नागरिकांमध्ये जनजागृती केली. आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांच्या नेतृत्वात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जितेंद्र नायक, प्रशांत उगमुगे, नरुल हक, अनिकेत शेगावकर, जितेन गोपवानी, सचिन पार्लेवार, सचिन शिरभावीकर आणि ज्योती पटेल प्रामुख्याने सहभागी झाले. महामेट्रोचे महेश गुप्ता, सुनील तिवारी, स्मार्ट सिटीच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, राहुल पांडे, अमित शिरपूरकर, मनीष सोनी आदीसुद्धा उपस्थित होते. मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनीही सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.
या रॅलीमध्ये नागरिकांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन उत्साहाने सहभाग नोंदविला. ५ किलोमीटर सायकलचे मार्गक्रमण करून जनजागृती केली. महिला, पुरुष, वयोवृद्ध नागरिक, युवा आदी सायकलपटू रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.