लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य निवडणूक आयोगाने प्रलंबित असलेल्या पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली आहेत. बुधवारी आयोगाने पाचही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढून विधानसभेसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत; सोबतच मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.राज्य निवडणूक आयोगाने २४ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढले होते. त्यात स्पष्ट केले होते की, जिल्हा परिषद व पं.स. च्या निवडणुका विहित कालावधीत घेण्याकरिता ४ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र विधानसभा मतदार यादी तयार करण्यात आली. त्यानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत गणनिहाय विभाजन करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. पत्रात असेही स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालायने राज्य सरकारला दोन महिन्याच्या कालावधीत आरक्षणासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. परंतु राज्य सरकारने ते पूर्ण केले नाही. त्यामुळे १९ जुलै २०१९ रोजी आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण वाटपाच्या आधारे कार्यक्रम तत्काळ जाहीर करण्याचेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केले होते.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी आयोगाने निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी कार्यक्रमही जाहीर केला आहे. आयोगाने जाहीर केलेला मतदार यादीचा कार्यक्रम
- प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करणे
- प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना ६ नोव्हेंबरपर्यंत दाखल कराव्यात.
- प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून ८ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध कराव्यात.
- मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ११ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करावी.