मंगेश तलमले
लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : रामटेक-भंडारा मार्गावरील खात (ता. माैदा) नजीकच्या ‘रेल्वे क्राॅसिंग’जवळ एक किमी लांबीच्या ‘ओव्हरब्रीज’चे काम सुरू आहे. अनागाेंदी कारभार आणि याेग्य उपाययाेजनांचा अभाव यामुळे या ‘ओव्हरब्रीज’चे बांधकाम खातवासीयांसाेबतच या मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी डाेकेदुखी ठरले आहे. हा ‘ओव्हरब्रीज’ची निर्मिती भिंतीवर अर्थात ‘आरओबी’ (राेड ओव्हरब्रीज) केली जात असून, त्या भिंतींमध्ये वीज केंद्रातील ‘फ्लाय ॲश’ माेठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ही ‘फ्लाय ॲश’ हळूहळू निघत असल्यााने नागरिकांनी याला विराेध दर्शविला असून, हा ‘ओव्हरब्रीज’ काॅलमवर तयार करावा अशी मागणी रेटून धरली आहे.
या ‘ओव्हरब्रीज’च्या कामाला २०१८ पासून सुरुवात करण्यात आली असून, ते अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. या ‘ओव्हरब्रीज’चे काम भिंतींवर केले जात असून, त्याला नागरिकांनी विराेध दर्शविला आहे. हे काम भिंतींवर न करता काॅलमवर करावे, यासाठी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता जया ठाकरे यांना निवेदनही दिले हाेते. त्यावेळी ‘ओव्हरब्रीज’चे बांधकाम काॅलमवर करण्यात येणार असल्याचे आश्वासन अभियंता ठाकरे यांनी नागरिकांना दिले हाेते.
प्रत्यक्षात काम या ‘ओव्हरब्रीज’चे अर्धे काम काॅलमवर तर अर्धे भिंतींवर केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी भिंतीवर करण्यात येणाऱ्या कामाला पुन्हा विराेध दर्शविला आहे. हा ‘ओव्हरब्रीज’ खात येथील मुख्य बाजारात उतरत असून, दुकानांसमाेर उभ्या राहणाऱ्या ट्रक व वाहनांमुळे येथे वाहतूक काेंडी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून, राेज वाहतूक काेंडी हाेत आहे. या राेडलगत गावात जाणारे रस्ते अरुंद असल्याने ट्रॅक्टर व इतर माेठ्या वाहनांमुळे घरांचे नुकसान हाेण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या ‘ओव्हरब्रीज’चे काम काॅलमवर करण्यात यावे, अशी मागणी नागिरकांनी केली असून, कामबंद व रास्ता राेकाे आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
....
बाजारपेठेत अडसर
या ‘ओव्हरब्रीज’चे एक टाेक खात येथील मुख्य बाजारपेठेत उतरले आहे. त्याच ठिकाणी काॅलमऐवजी भिंतींवर बांधकाम केले जात आहे. या भागात राेडच्या दाेन्ही बाजूंना विविध दुकानांसाेबत व्यापाऱ्यांचे गाेडाऊन आहेत. शिवाय नागरिकांचा सतत राबता असताे. ‘ओव्हरब्रीज’च्या भिंतीमुळे नागरिकांना पलिकडे जाण्यास त्रास हाेणार असून, ते धाेकादायक ठरणार आहे. हेच काम काॅलमवर केल्यास नागरिकांना पलिकडे जाणे साेयीचे हाेणार असून, ‘ओव्हरब्रीज’च्या खालच्या जागेचा वापर वाहनतळासाठी हाेऊ शकताे.
....
भिंतीतील राखेची समस्या
तुमसर (जिल्हा भंडारा) येथे अशाच प्रकारच्या ‘ओव्हरब्रीज’चे बांधकाम करण्यात आले असून, त्याच्या भिंतींमध्ये मुरुमाऐवजी माेठ्या प्रमाणात वीज केंद्रातील राख भरली आहे. हा ‘ओव्हरब्रीज’ रहदारीसाठी सुरू हाेण्यापूर्वीच त्यातील भिंतींमधील राख बाहेर येत असून, ती राेडवर पसरत आहे. ती राख वाहनांच्या चाकांमुळे नागरिकांच्या डाेळ्यात तसेच श्वासाद्वारे फुफ्फुसात जात असल्याने त्यांना आराेग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. हीच समस्या खात येथेही उद्भवणार असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले.