आॅनलाईन लोकमतनागपूर : अस्तित्व संघटना बुलडाणाच्या वतीने मागील पाच वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीसाठी विधानभवनावर सातत्याने मोर्चा काढण्यात येत आहे. या वर्षीही बुलडाणा जिल्ह्यातील महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढला. पोलिसांनी मॉरिस टी पॉर्इंटवर हा मोर्चा अडविला. या मोर्चातील महिलांनी शासनाची प्रतिकात्मक तिरडी काढण्याचा प्रयत्न केला. दिवसभर महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली. परंतु त्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नसल्यामुळे सायंकाळी या महिलांचा तोल सुटला. महिला लोटांगण घेत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सरसावल्या असता पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रोखले. या झटापटीत शांताबाई कुथवडे या महिलेला भोवळ येऊन ती खाली पडली. तिला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मॉरिस टी पॉर्इंटवर तणावाचे वातावरण होते.बुलडाणा जिल्ह्यातील अस्तित्व संघटना आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता हा मोर्चा मॉरिस टी पॉर्इंटवर पोहोचला. दिवसभरात वारंवार मागणी करूनही पोलिसांच्या वतीने मोर्चातील महिलांना मुख्यमंत्र्यांची वेळ देण्यात आली नाही. दिवसभरात या महिलांनी भजन, कीर्तन, दारूबंदीवरील गीते गाऊन आपल्या मागण्या शासन दरबारी रेटल्या. महिलांनी शासनाची प्रतिकात्मक तिरडी काढण्याचा प्रयत्न केली असता पोलिसांनी तिरडी जप्त केली. दुपारच्या वेळी या महिलांनी आपल्या हातातील बांगड्या फोडून त्या एका मडक्यात गोळा करून शासनाला बांगड्यांचा अहेर देण्याचे आंदोलन केले. मुख्यमंत्री भेटीसाठी अनुकूल नसल्याचे पाहून सायंकाळी या महिलांचा तोल सुटला. दरम्यान महिलांनी सायंकाळी ६ वाजता लोटांगण घालत मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. यात शांताबाई कुथवडे ही महिला भोवळ येऊन खाली कोसळली. लगेच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान काहीही झाले तरी मुख्यमंत्र्यांशी भेट होईपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार अस्तित्व संघटनेच्या प्रेमलता सोनोने, सुशिला वनवे, नर्मदा वानखेडे, संगीता वाघमारे, गीता मानकर यांनी व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत या महिला मोर्चास्थळी तळ ठोकून बसल्या होत्या.
दारूबंदीची मागणी करणाऱ्या महिलांवर बळाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:28 PM
दारूबंदीच्या मागणीसाठी महिला लोटांगण घेत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सरसावल्या असता पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रोखले. या झटापटीत शांताबाई कुथवडे या महिलेला भोवळ येऊन ती खाली पडली. तिला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मॉरिस टी पॉर्इंटवर तणावाचे वातावरण होते.
ठळक मुद्देमोर्चेकरी महिला बेशुद्ध : दारूबंदीसाठी शासनाची प्रतिकात्मक तिरडी