विशाल महाकाळकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरी अठराविश्वे दारिद्र्य, दररोज दोन वेळा पोट भरेल याची शाश्वतीदेखील नाही. क्षणाक्षणाला संघर्षांशी सामना हीच त्यांची नियती. मात्र अशा स्थितीतदेखील माणुसकीचे भान त्यांनी जपले आहे. म्हणूनच बाप्पाच्या विसर्जनानंतर तलावांमध्ये होणारा कचरा व निर्माल्य तर ते वेचतातच. मात्र प्रसाद म्हणून भक्तांनी फेकलेली फळे व इतर साहित्य गोळा करून त्यांचे गरजूंना वाटप करण्याचे पुण्यदेखील करतात. नागपुरातील रोहणकर कुटुंबीयांनी समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला असून भक्तांनी यापासून बोध घेण्याची आवश्यकता आहे.प्रशासनाकडून ‘इकोफ्रेंडली’ गणेश विसर्जनाबाबत जागृती करण्यात येत असली तरी अनेक गणेशभक्तांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. शहरातील विविध तलावांमध्ये थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करत असताना सोबत ते नैवेद्य, फळे, हारतुरेदेखील टाकतात. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र या तलावांमधील दृश्य पाहिले की नागरिकांच्या असंवेदनशीलतेचा पुरावा मिळतो. जागोजागी पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, फळे, प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील फुटाळा व नाईक तलावात प्रामुख्याने हे चित्र दिसून आले.यातील साहित्य वेचण्यासाठी शहरातील काही लोक तलावांमध्ये जाऊन गणपती मूर्तीवरील आभूषणे आणि बाजारात विक्री होईल असे साहित्य जमा करण्याचे काम करतात. रोहणकर कुटुंबीयदेखील त्यातलेच असून मागील अनेक वर्षांपासून ते हे काम करत आहेत.गरिबीची भूक किती वेदनादायी असते याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच ते तलावातील पाण्यामधून आपल्या कामाच्या वस्तू गोळा तर करतातच.मात्र सोबतच फळे, नारळ, काकड्या, जनावरांचे खाद्य होऊ शकेल असे साहित्यदेखील बाहेर काढतात.प्रभाकर रोहणकर, आकाश रोहणकर, अमोल रोहणकर हे या कामात पुढाकार घेतात.
भक्तांनी सामाजिक भान जपावे‘लोकमत’ने ज्यावेळी छोटा ताजबाग परिसरातील रोहणकर कुटुंबीयांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपल्या या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विविध तलावांत जाऊन नित्यनेमाने हे कार्य करत आहोत. आमच्या पोटाची खळगी भरल्या जातेच. शिवाय वंचितांनादेखील मदत करण्याचे पुण्य आमच्या हातून होऊ शकते. विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्तींसमोर मोठ्या प्रमाणात नैवेद्य, फळे टाकण्यात येतात. याऐवजी जर हा नैवेद्य व फळे यांचे वंचितांना अगोदरच वाटप केले तर खºया अर्थाने ‘विघ्नहर्ता’ त्यांना पावल्याचे समाधान मिळेल. भक्तांनी सामाजिक भान जपण्याची आवश्यकता आहे, असे मत आकाश रोहणकर याने व्यक्त केले.