आयटी फॉर परिवहन अभियान : विद्यार्थ्यांच्या सूचनांवर तयार होतोय अहवालनागपूर : माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून रस्ते वाहतुकीचे प्रश्न प्रभावीपणे कसे सोडविता येईल, यासाठी नागरिकांकडून सूचना तसेच अभिनव कल्पना जाणून घेतल्या जात आहे. यासाठी आयटी फॉर परिवहनतर्फे अभियान राबविण्यात आले आहे. आयटी फॉर परिवहनची चमू सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून विदर्भातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी यासंदर्भात संवाद साधला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सूचनांवर एक अहवाल तयार केला जात असून तो शासनास सादर केला जाणार आहे.आयटी फॉर परिवहनतर्फे या दौऱ्यात नागपूरच्या अजिता डोरलीकर, जयपूरचे वीरेंद्र शर्मा, नाशिकचे नितीन शुक्ल, भंडाऱ्याचे महेंद्र निंबार्ते यांचा समावेश आहे. ही चमू आज नागपुरात आली असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत याविषयाची सविस्तर माहिती दिली. नितीन शुक्ल यांनी सांगितले की, रस्ते वाहतूक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित असणे ही संपूर्ण देशासमोरील एक मोठी समस्या बनली आहे. अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील रस्ते वाहतूक ही अधिक चांगली व सुरक्षित कशी करता येईल, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे एक आयटी टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. या टास्क फोर्समध्ये मोहन दास पै, विनित गोयंका यांसारख्या तज्ञांचा समावेश आहे.विनित गोयंका यांच्या नेतृत्वात आयटी फॉर परिवहन हे अभियान देशभरात राबविले जात आहे. यात अशासकीय संघटनांच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांशी संवाद साधून रस्ते वाहतुकीसंदर्भात त्यांच्या काय सूचना व कल्पना आहेत त्या समजून घेणे आणि त्याचा अहवाल तयार करण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळी टीम कार्यरत आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता पहिल्या टप्प्यात जवळपास १५ हजार नागरिकांच्या सूचना एकत्रित करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या या टीमने गेल्या तीन दिवसात भंडारा, रामटेक, गोंदिया आदी जिल्ह्याच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी परिसंवादाच्या माध्यमातून संवाद साधला. महाविद्यालयीन विद्यार्र्थ्यांना रस्ता वाहतुकीसंदर्भात काय वाटते याचा एक अहवाल तयार करून तो सुद्धा शासनास सादर केला जाईल. भविष्यात रस्ते वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शासन जो काही धोरणात्मक निर्णय घेईल, तेव्हा या अहवालाचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास या चमूने यावेळी व्यक्त केला.(प्रतिनिधी)
रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर
By admin | Published: January 08, 2016 4:01 AM