लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : नगर परिषदेच्या घरकुलाचा वापर अवैध दारूविक्री करण्यासाठी केला जात असल्याची बाब शनिवारी (दि. २४) सकाळी उघड झाली. दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रामटेक शहरातील आझाद वाॅर्डमध्ये केलेल्या कारवाईमध्ये अवैध दारूविक्रेत्यात ताब्यात घेत त्याच्याकडून २८ हजार ४९५ रुपये किमतीची ४३५ लीटर माेहफुलाची दारू जप्त केली.
आझाद वाॅर्डमधील एका घरकुलात अवैध दारूविक्री केली जात असल्याची माहिती दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे या विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी धाड टाकून या घरकुलाची कसून झडती घेतली. यात त्यांना दाेन प्लास्टिकच्या कॅन, दाेन रबरी ट्यूब व ३०५ बाटल्यांमध्ये माेहफुलाची एकूण ४३५ लीटर दारू भरली असल्याचे आढळून आहे. या दारूची एकूण किंमत २८ हजार ४९५ रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही अवैध दारूविक्री सुनील चाेखी यादव हा करीत असल्याचे स्पष्ट झाले. दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याच्या विराेधात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून त्याला सूचनापत्र देऊन सोडून दिले. मात्र, ही दारू ताे कुठून आणायचा, याबाबत चाैकशी करून दारू उत्पादकांपर्यंत पाेहाेचण्याचे व त्यांना अटक करण्याचे औदार्य दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखविले नाही. ताे यापुढे अवैध दारूविक्री करणार नाही, याची हमी काेण देणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला.
....
रामटेक पाेलीस अनभिज्ञ
नगर परिषदेच्या मालकीची ही घरकुले रामटेक शहरातील दुधाळा राेडवरील आझाद वाॅर्डमध्ये आहेत. या घरकुलांपासून एक किमी अंतरावर रामटेक पाेलीस ठाणे आहे. या परिसरातून पाेलिसांची नेहमीच वर्दळ असते. या भागातील काही नागरिक पाेलीस कर्मचाऱ्यांना ओळखतात. मात्र, येथील दारूविक्रीबाबत पाेलिसांना अद्यापही सुगावा मिळाला नाही, याबाबत नवल व्यक्त केले जात आहे. काहींनी तर पाेलिसांनी याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा आराेप केला आहे.
...
घरकुले नेमकी कशासाठी बांधली?
रामटेक नगर परिषदेने आझाद वाॅर्डतील दुधाळा राेडलगत ७२ घरकुलांचे बांधकाम केले आहे. त्या घरकुलांचे अद्यापही लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले नाही. तिथे कुणीही रस्ता नसल्याने काहींनी त्यावर अवैध कब्जा मिळवला आहे तर काही त्या घरकुलांचा वापर दारू पिणे, जुगार खेळणे, अवैध दारूविक्री करणे यासह अन्य अवैध व अनैतिक कामांसाठी केला जात आहे. हा प्रकार पालिकेतील पदाधिकाऱ्यांना माहिती असूनही ते केवळ तमाशा बघण्यात धन्यता मानत आहेत. दुसरीकडे, लाभार्थी माेडकळीस आलेल्या घरांमध्ये राहत आहेत.