लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरातील समर्थ काॅन्व्हेंटजवळ नगर परिषदेच्या मालकीची ५.३० एकर जमीन आहे. या जमिनीकडे पालिका प्रशासनाने गेल्या ११ वर्षांपासून लक्ष दिले नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत पीक घ्यायला सुरुवात केली आहे. अतिक्रमणधारकांनी सध्या पेरणीच्या उद्देशाने या जमिनीची पूर्वमशागत केली आहे. या गंभीर प्रकरणाबाबत माजी नगरसेवक चंद्रशेखर भाेयर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे.
रामटेक नगर पालिकेने काही वर्षांपूर्वी कामासाठी शहरालगत ५.३० एकर शेती अधिग्रहित केली. यासाठी पालिका प्रशासनाने अधिग्रहणाची संपूर्ण प्रक्रिया शासकीय नियमानुसार पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा आर्थिक माेबदलाही दिला. माेबदला प्राप्त हाेताच शेतकऱ्यांनी त्या शेतीवरील ताबा साेडला आणि पालिका प्रशासनाने ती जमीन स्वत:च्या ताब्यात घेतली. परिणामी, शहरालगतची १०४/२, १०५/२, १०६, १०७/२, ११०/२ व १११/२ या सर्व्हे क्रमांकाच्या ५.३० एकर जमिनीचा सातबारा रामटेक नगर पालिकेच्या नावे आहे.
पालिका प्रशासनाने ताबा घेतल्यानंतर काही वर्षांतच या जमिनीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्यामुळे चार ते पाच शेतकऱ्यांनी त्या जमिनीवर अतिक्रमण करीत चक्क शेती करायला सुरुवात केली. हा प्रकार पालिका प्रशासनाला माहिती असताना प्रशासन काहीही करायला तयार नसल्याने अतिक्रमणधारकांना पालिका पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची शक्यता जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे. याच पाठबळामुळे पालिका प्रशासन ठाेस कारवाई करायला तयार नसल्याचेही काहींनी सांगितले. दुसरीकडे, पालिका प्रशासनाने या जमिनीची पुन्हा माेजणी करून ती ताब्यात घ्यावी. त्या जमिनीला तारांचे किंवा भिंतींचे कुंपण तयार करावे, अशी मागणी चंद्रशेखर भाेयर यांनी केली असून, असे न केल्यास आमरण उपाेषण करण्याचा इशारा दिला आहे.
...
सूचना फलक फेकला, कुंपणाचा अभाव
ही बाब लक्षात येताच ११ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी रवींद्र भेलावे यांनी याबाबत रामटेक पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी पाेलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटवून ती जमीन पुन्हा ताब्यात घेत माेजणी केली व तिथे सूचना फलक लावला. मात्र, त्या जागेला सुरक्षा भिंती अथवा तारांचे कुंपण घालण्यात आले नाही. पालिकेची पाठ फिरताच त्या शेतकऱ्यांनी सूचना फलक काढून फेकला आणि पुन्हा याच जमिनीवर अतिक्रमण करून शेती करायला सुरुवात केली. परंतु, पालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही.
...
क्रीडांगणासाठी राखीव
पालिका प्रशासनाने ही जमीन नेमकी काेणत्या उद्देशासाठी अधिग्रहित केली हाेती, हे मात्र स्पष्ट हाेऊ शकले नाही. त्या जागेचा वापर डम्पिंग यार्डसाठी हाेऊ शकला असता. ही जमीन शहरातील समर्थ काॅन्व्हेंटलगत आहे. त्यामुळे त्या जमिनीचा वापर क्रीडांगणासाठी हाेऊ शकताे, असा मतप्रवाह पुढे आला. त्याअनुषंगाने या ठिकाणी क्रीडांगण तयार करण्याची पालिका प्रशासनाची याेजना हाेती. मात्र, गेल्या १० वर्षांत पालिका पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.
...
ही जमीन नगर पालिकेच्या मालकीची आहे. त्या जागेवर कुणी अतिक्रमण करून शेती करीत असेल तर संबंधितांवर त्वरित कारवाई केली जाईल. अतिक्रमण हटवून ती जमीन ताब्यात घेतली जाईल.
- दिलीप देशमुख,
नगराध्यक्ष, रामटेक.