नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आरक्षित तिकीट तपासणीसाठी हँड हेल्ड टर्मिनल्स (एचएचटी) चा वापर केला जात आहे. यामुळे आता रेल्वेला कागदांवर आरक्षण (रिझर्वेशन) तक्ते छापण्याची गरज उरलेली नाही. अर्थात हे सर्व काम पेपरलेस होत आहे.
तिकिट तपासणीसाला (टीसी) आरक्षण प्रणालीची सहज कल्पना यावी म्हणून रेल्वेकडून कागदावर आरक्षण तक्ते छापावी लागतात. त्यासाठी एका विभागात सरासरी ६० हजार कागदांची (पानांची) गरज भासते. एचएचटीच्या वापरामुळे हे कागदावरचे तक्ते छापण्याची आता गरज नाही. मोबाईल, टॅबच्या स्क्रिनवर ती आकडेवारी दिसून येते आणि त्याची रिअल टाईम पडताळणीही करता येते. ज्यामुळे टीसीला पुढची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडता येते.
एचएचटीमुळे पेपरलेस वर्क होत असल्याने रेल्वेच्या कार्बन फुटप्रिंटची, कागदाच्या छपाईची आणि त्यावर होणाऱ्या खर्चाची तसेच मणूष्यबळाचीही बचत होत आहे. अचूक काम होत असल्याने नागपूर विभागात एचएचटीचा१०० टक्के वापर केला जात असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.