नरेश डोंगरे
नागपूर : विविध राज्यात गांजाची खेप पोहचवणाऱ्यांनी आता तस्करीसाठी वेगवेगळ्या राज्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना टार्गेट केले आहे. गरीब महिला-पुरुषांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा कुरियर म्हणून वापर करणारे गांजा तस्कर रोज बेमालूमपणे लाखोंच्या गांजाची तस्करी करीत आहेत. सहा महिन्यात एकट्या नागपुरात साडेतीन क्विंटल गांजा जप्त केला. त्यावरून फोफावलेल्या गांजा तस्करीची कल्पना यावी.
काही वर्षांपूर्वी मध्य भारताशी संलग्न असलेल्या आंध्र प्रदेशमधून नागपूर मार्गे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जायची. आंध्र-तेलंगणातील वारंगल भागात मोठ्या प्रमाणावर गांजाचे पीक घेतले जायचे अन् तस्कर चक्क ट्रकने गांजाची तस्करी करायचे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका-पाठोपाठ अनेक गांजाने भरलेले ट्रक जप्त करून आंध्र-तेलंगणातील गांजा तस्करांचे नेटवर्क मोडून काढले. त्यानंतर तस्करांनी भाड्याच्या टॅक्सीतून गांजाची तस्करी सुरू केली. दिल्ली, भोपाळ, ईटारसी येथून कुरियर बोलवायचे आणि लाखो रुपयांच्या गांजाची खेप त्यांच्या माध्यमातून विविध राज्यात पोहचवायची, असा प्रकार सुरू झाला. विशेष म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेदरम्यान अनेक निर्बंध, अनेक अडचणी असताना आंध्र-तेलंगणातून नागपूरमार्गे लाखो रुपयांच्या गांजाची तस्करी केली जात असल्याचे अनेकदा उघड झाले होते. दरम्यान, रस्ता मार्गाने वाहनातून गांजाची खेप आणल्यास जागोजागी पोलिसांच्या चाैकशीला सामोरे जावे लागते. त्यामुळे पकडले जाण्याचा धोका जास्त असतो. तो ध्यानात घेऊन गांजा तस्करीसाठी तस्करांनी रेल्वे निवडली आहे. एका डब्यात गांजा ठेवायचा अन् दुसऱ्या डब्यातून प्रवास करायचा, अशी साधारणत: गांजा तस्करांची पद्धत आहे.
ओडिशांच्या तस्करांची चलती
रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्यांमध्ये सध्या इतर प्रांताच्या तुलनेत ओडिशाच्या गांजा तस्करांची संख्या मोठी आहे. सध्या त्यांचीच गांजा तस्करीत चलती असल्याचे सांगितले जाते. ओडिशाच्या मलकनगिरी भागात गांजाचे मोठे उत्पादन घेतले जाते. तेथील गांजा तस्कर वेगवेगळ्या वजनाचे गांजाचे पॅकेट तयार करतात अन् वेगवेगळ्या प्रांतातील साथीदारांकडे ते पाठवितात. गांजाचे एक पॅकेट किमान (वजनानुसार) १० हजारांचे असते. रोज हजारो पॅकेट वेगवेगळ्या शहरात पाठविले जातात.
कारवाईचे स्वरूप
जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत रेल्वेतून गांजा तस्करी करणाऱ्या २२ आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३५९ किलो गांजा जप्त करण्यात आला. बाजारपेठेत या गांजाची किंमत ३५ लाख, ९० हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. तस्करीची पद्धत एवढी सराईत असते की वेगवेगळ्या रेल्वेगाड्यातून गांजा नेणाऱ्या २० ते २५ जणांपैकी एखादाच आरोपी पोलिसांच्या हाती लागतो.
----